भारत-पाकिस्तान, भारत-ऑस्ट्रेलिया असे क्रिकेट सामने म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील एकप्रकारचे युद्धच असते. अशा सामन्यात काही खास, अविस्मरणीय काही घडू नये म्हणजे आश्चर्यच. क्रिकेट रसिकांकडे अशा सामन्यांच्या अनेक आठवणी ताज्या असतील. त्यातीलच एक अविस्मरणीय सामना म्हणजे २२ एप्रिल १९९८ म्हणजेच बरोबर २४ वर्षांपूर्वी शारजात झालेला भारत-ऑस्ट्रेलिया संघातील सामना. हा सामना शारजात वाळूच वादळ आल्यानंतर सचिनने केलेल्या शतकी खेळीसाठी प्रसिद्ध आहे. आज या सामन्याला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने आजच्या लेखात आपण या सामन्याच्या आठवणींना उजाळा देऊया.
या सामन्याचा आधी इतिहास पाहू. १९९८ ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली होती. या मालिकेला प्रायोजक कोको कोला होते. त्यामुळे त्याला मालिकेला कोकाकोला कप असे नाव पडले होते. त्या मालिकेतील ऑस्ट्रेलिया संघ सर्वात बलाढ्य होता. त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागायची. त्यांच्या संघात मार्क वॉ, मायकल बेवन, रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, टॉम मूडी, डॅमिएन फ्लेमिंग असे खेळाडू होते आणि त्यांचा कर्णधार होता स्टिव्ह वॉ.
अशा बलाढ्य संघाविरुद्ध भारताला या मालिकेतील शेवटचा साखळी फेरीचा सामना खेळायचा होता. त्यात भर एप्रिल महिन्यात ही मालिका होत असल्याने कडक उन्हाळा होता. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने तितकासा महत्त्वाचा नव्हता कारण त्यांनी आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र भारताला हा सामना अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा होता.
त्यावेळी सचिन भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार खेळाडू होता. तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्नही फॉर्ममध्ये होता. विशेष म्हणजे या मालिकेआधी वॉर्नला खांद्याची दुखापत झाली होती. पण त्याने ऑस्ट्रेलियाला परत न जाता ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात या दोन उभारत्या स्टार खेळाडूंमधील मैदानावरील युद्धाची जोरदार चर्चा होती.
अशातच हा महत्त्वाचा सामना होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजी फळीने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २८४ धावांचा डोंगर उभा केला होता. टी२०च्या पूर्वीचा काळ असल्याने ही मोठी धावसंख्या होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मायकल बेवनने १०१ धावांची शतकी खेळी केली होती. तर मार्क वॉने ८१ धावांची खेळी केली होती. भारताकडून वेंकटेश प्रसादने सर्वाधिक म्हणजे २ विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपला आणि शारजाच्या वाळवंटातील वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. त्यावेळी भारताला २८५ धावांचे आव्हान होते. तसेच अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर कमीत कमी भारताला २५४ धावा करणे गरजेचे होते. तरच भारत न्यूझीलंडला नेटरनरेटमध्ये मागे टाकू शकणार होता. पण वादळाने या सामन्यात अर्धातासाचा व्यत्यय आणला.
अखेर सामना सुरु झाला तेव्हा भारतासमोरील समीकरण बदलले होते. भारताला विजयासाठी ४६ षटकात २७६ धावांचे आव्हान देण्यात आले होते. तसेच अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला ४६ षटकात २३७ धावा करणे गरजेचे होते.
यावेळी जेव्हा सचिन गांगुलीसह मैदानात उतरला तेव्हा वेगळ्याच फॉर्ममध्ये असल्याचे जाणवत होते. त्याने त्याच्या भात्यात असणारे सर्व फटके मारायला सुरुवात केली होती. पण गांगुलीला फ्लेमिंगने बाद केले. पुढे मूडीने नयन मुंगिया आणि मोहम्मद अझरुद्दीनची विकेट घेतली. स्टिव्ह वॉने अजय जडेजाला बाद केले. त्यामुळे भारतासाठी हा सामना कठिण पेपर असल्याचेच जाणवत होते. पण सचिन मात्र या सामन्यात दृढनिश्चयाने खेळत होता. भारताने ४ विकेट्स गमावल्या तेव्हा १३८ धावा केल्या होत्या. २९ षटके झाली होती.
त्यानंतर मात्र सचिनने आक्रमक पवित्रा स्विकारला. सचिनने समोर कोणता गोलंदाज आहे याचा विचार न करता फटके मारायला सुरुवात केली. त्याने कास्प्रोविक, वॉर्न, स्टिव्ह वॉ, मुख्य म्हणजे शेन वॉर्न अशा सगळ्याच गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमक फटके मारले. बरं त्याने उगीच आक्रमक फटके मारायचे म्हणून बॅट उचलली नाही. तर त्याने कट, पूल, फ्लिक, ड्राईव्ह अशा सगळ्या क्रिकेटींग फटक्यांचा वापर केला.
#OnThisDay 1998. @sachin_rt and @ShaneWarne go to war, with Sachin hitting 143 from 131 in a Sharjah ODI! pic.twitter.com/DkrOYFSm0r
— ICC (@ICC) April 22, 2016
सचिनच्या प्रत्येक फटक्याला टोनी ग्रेग या महान समालोचकाच्या समालोचनाने सुरेख दाद मिळत होती. त्यामुळे क्रिकेटरसिक जसे सामना डोळ्याने सामना पहात होते. तसेच कानाने अनुभवत देखील होते. सचिनने १११ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह त्याचे शतक पूर्ण केले. शतकानंतर सचिन आणखी आक्रमक झाला.
मात्र भारताला विजयासाठी २० चेंडूत केवळ ३४ धावांची गरज असताना सचिन १३१ चेंडूत १४३ धावा करुन बाद झाला. त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते. सचिन फ्लेमिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक गिलख्रिस्टने घेतला. सचिन बाद झाल्यावर मात्र पुढे भारताला केवळ ८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ४६ षटकात ५ बाद २५० धावांवर संपुष्टात आला. तो सामना ऑस्ट्रेलियाने २६ धावांनी जिंकला होता. पण सचिनने बाद होण्याच्याआधीच त्याच्या या वादळी खेळीने भारताला अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करुन दिला होता. सामनावीराचा पुरस्कारही त्या दिवशी सचिनलाच मिळला होता. त्याने शारजात आलेल्या वाळूच्या वादळानंतर केलेली वादळी खेळी म्हणून त्याचे हे शतक प्रसिद्ध झाले. त्याच्या या आक्रमकतेबद्दल आजही वॉर्न म्हणतो की त्याला सचिनच्या फलंदाजीची स्वप्ने पडतात.
It was legend v legend on this day in 1998 when @ShaneWarne and @sachin_rt went head-to-head in Sharjah 💥
The Little Master hit a remarkable 143 off 131 balls in his famous 'Desert Storm' innings 🌪️ pic.twitter.com/xAyMA4x2tx
— ICC (@ICC) April 22, 2021
त्या दिवशी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला खरा पण चर्चेत मात्र फक्त सचिन तेंडुलकरच राहिला! एक प्रकारची ही ऑस्ट्रेलियासाठी मानसिक हार होती. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सचिनने आपल्या अद्भुत कौशल्याने मैदानावरच नाही तर मानसिक पातळीवर देखील धूळ चारली होती. याचाच फायदा उठवत अंतिम सामन्यात देखील सचिनने अविश्वसनीय फलंदाजी केली. आणि शतक झळकावत भारताला कोकाकोला कप जिंकून दिला. आजही सचिनची ही खेळी वनडे इतिहासातील एक सर्वोत्तम खेळी मानल्या जाते.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करत चेन्नईची टर उडवणारा ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
पराभवातही मुंबईचीच ‘सत्ता!’ आयपीएल इतिहासातील सर्वात लाजीरवाणा विक्रम पाच वेळच्या विजेत्याच्या नावे
‘यांच्यापेक्षा तर उनाडकटच भारी!’, रोहित अन् इशानची खेळी पाहून संतापले नेटकरी, होतायत जोरदार ट्रोल