fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…म्हणून एमएस धोनीने काढल्या नाही त्या एकेरी धावा

बेंगलोर। रविवारी (21 एप्रिल) एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2019 चा 39 वा सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बेंगलोरने 1 धावेने विजय मिळवला.

या सामन्यात बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या षटकात 26 धावांची गरज होती. या षटकात धोनीने 3 षटकार आणि 1 चौकार मारत चेन्नईला विजयाच्या समीप पोहचवले होते.

परंतू शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना चेन्नईच्या दीपक चहरला पार्थिव पटेलने धावबाद केले. त्यामुळे चेन्नईला 1 धावेने पराभव स्विकारावा लागला. चेन्नईकडून या सामन्यात कर्णधार एमएस धोनीने 48 चेंडूत नाबाद 84 धावा करत एकाकी झुंज दिली. पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

त्याने 19 व्या षटकात फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो असतानाही एकेरी धावा काढण्यास पसंती दाखवली नव्हती. त्यामुळे अनेकांनी त्या धावा काढणे गरजेचे होते असे म्हटले आहे.

पण धोनीने त्या एकेरी धावा न काढण्यामागचे कारण सामन्यानंतर स्पष्ट केले आहे. धोनी म्हणाला, ‘शेवटच्या षटकांमध्ये शॉर्ट चेंडू टाकले जात होते. त्यावर धावा काढणे कठिण होते. चेंडू सहज बॅटवर येत नव्हता. यावेळी जेव्हा नवीन फलंदाज येतो त्यावेळी त्याच्यासाठी धावा काढणे अवघड असते.’

‘मी त्याआधी अनेक चेंडू खेळलो होतो. त्यामुळे मी तो धोका पत्करु शकत होतो. कारण आम्हाला खूप धावांची गरज होती. मला वाटते 10-12 चेंडूत आम्हाला 40 किंवा 36 अशा काहीतरी धावा हव्या होत्या. त्यामुळे आम्हाला अनेक बाऊंड्रीजची गरज होती.’

‘तुम्ही आत्ता त्याचे गणित मांडू शकता की त्यावेळी दोन किंवा एक धावा काढले असते तर सामना आमच्या हातात असता. पण आम्ही सामना एक धावेने हरलो. पण त्याचवेळी तूम्ही असाही विचार करता की एक-दोन चेंडू निर्धाव गेल्यावर एखादी अतिरिक्त बाउंड्री मारता आली असती किंवा नसती.’

धोनीने या 19 व्या षटकातील तीन चेंडूवर एकेरी धाव काढण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे याच षटकातील पाचव्या चेंडूवर धोनीने एक धाव काढली आणि षटकातील शेवटचा चेंडू ब्रावोला खेळायला दिला. पण ब्रावो झेलबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

२०१९ विश्वचषकासाठी असा आहे १५ जणांचा अफगाणिस्तान संघ

एमएस धोनी आयपीएलमध्ये ही खास ‘डबल सेंच्यूरी’ करणारा पहिला भारतीय

 

You might also like