भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. शास्त्री यांनी स्वतः ही स्पर्धा प्रशिक्षक म्हणून आपली अखेरची स्पर्धा असेल असे जाहीर केले होते. विश्वचषकासाठी युएईला रवाना होण्याआधी शास्त्री यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे विशेष कौतुक केले.
धोनी सर्वोत्कृष्ट टी२० व वनडे कर्णधार
शास्त्री यांनी एका मुलाखतीत बोलताना धोनी विषयी म्हटले,
“धोनीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ते सर्व काही प्राप्त केले आहे जे कोणताही कर्णधार करू इच्छितो. त्याच्या नेतृत्वाचे आकडेच सर्वकाही सांगून जातात. मी त्याला आजवरचा सर्वात्कृष्ट मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणेल. त्याने काय जिंकले नाही? आयसीसीच्या स्पर्धा स्पर्धा, आयपीएल, चॅम्पियन्स लीग सर्वकाही त्याच्या नावे आहे. याबाबतीत त्याच्या आसपासही कोणी नाही.”
धोनीच्या नावे सर्व स्पर्धांचे विजेतेपद
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक व २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या व्यतिरिक्त भारत त्याच्याच नेतृत्व जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला तीन वेळा आयपीएल व एकदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवून दिले आहे.
धोनी संघाचा मेंटर
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धोनीला मेंटर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून, अजूनही आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्व करतो. धोनी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांना त्यांच्या अखेरच्या मोठ्या स्पर्धेत मदत करताना दिसेल. विराट देखील या विश्वचषकानंतर टी२० संघाचे नेतृत्व सोडणार आहे. मात्र, वनडे व कसोटी संघाचा कर्णधार म्हणून तो आपली कारकीर्द आणखी पुढे नेऊ शकतो.