Cheteshwar Pujara And Gautam Gambhir: भारतीय संघ पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये इंग्लंडविरूद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेत भारतीय कसोटी संघाची ‘ढाल’ मानले जाणारे विराट कोहली आणि आर. अश्विन खेळणार नाहीत, कारण दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याव्यतिरिक्त, रोहित शर्मानेही कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवत आहे. या मालिकेसाठी बहुसंख्य युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला ‘अनुभवहीन’ म्हणून पाहिले जात आहे. अशा परिस्थितीत, भारतासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या चेतेश्वर पुजाराने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या संभाव्य फोन कॉलच्या प्रश्नावर आपले मौन सोडले आहे.
रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचा फलंदाजी विभाग अनुभवहीन झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान पुजाराला विचारण्यात आले की, “तुम्हाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा फोन आला आहे का?” यावर पुजाराने उत्तर दिले, “नाही, अजून तरी नाही.”
103 कसोटी सामने खेळलेल्या या अनुभवी खेळाडूने पुढे सांगितले की, जर त्याला संधी मिळाली, तर तो पुनरागमनासाठी तयार आहे. पुजारा म्हणाला. “मी तयार आहे. मला माहीत नाही की ते मला निवडतील की नाही. पण जर मला संधी मिळाली, तर होय, पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. एक क्रिकेटर म्हणून, तुम्हाला नेहमी वाटते की जोपर्यंत तुम्ही तंदुरुस्त आहात, जोपर्यंत तुम्ही योगदान देत आहात, आणि जर माझी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी असेल, आणि मी चांगली तयारी करत असेन, तर मला संधी मिळाली तर, होय, संघाचा भाग होऊन मला खूप आनंद होईल,” (Cheteshwar Pujara said that if he gets an opportunity to play in the Indian Test team, it would be an honor for him to represent the country once again)
पुजाराने भारतासाठी 103 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. या काळात उजव्या हाताच्या या फलंदाजाने 43.60च्या सरासरीने 7,195 धावा केल्या आहेत. त्याने 19 शतकांसह 35 अर्धशतके झळकावली आहेत. पुजाराला भारतीय कसोटी क्रिकेटची ‘ढाल’ मानले जाते, परंतु सध्या तो भारतीय कसोटी संघापासून बऱ्याच काळापासून दूर आहे. (Cheteshwar Pujara’s performance in Test cricket)






