---Advertisement---

‘सिक्सर किंग’ ही उपमा सर्वात आधी मिळवणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटरला ओळखले का? पाहा फोटो

On: बुधवार, मार्च 10, 2021 6:50 PM
---Advertisement---

काहीवर्षांपूर्वी टी२० क्रिकेटला सुरुवात झाली आणि क्रिकेटमध्येही वेग आला. खेळाडू प्रत्येक चेंडूवर चेंडू टोलावण्याचाच नाही तर उंच आणि लांब मारण्याचा प्रयत्न करु लागले. यामध्येही ख्रिस गेल, युवराज सिंग, रोहित शर्मा अशा खेळाडूंनी षटकार किंग अशी ओळख मिळवली. पण भारताकडून युवराज आणि रोहित यांच्याही आधी आक्रमक फलंदाजी करणारे काही फलंदाज होते, ज्यांच्याकडे लांबलचक षटकार मारण्याची क्षमता होती. त्यातीलच एक क्रिकेटपटू म्हणजे सलीम दुरानी.

दुरानी हे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होते. ते क्रिकेट सामन्यांमध्ये फार सहजतेने षटकार मारत, त्यामुळे १९६० च्या दशकातील ‘सिक्सर किंग’ अशी त्यांची ओळख होती. सध्या ते ८६ वर्षांचे आहेत. त्यातच आज, १० मार्च असल्याने दुरानी यांची आठवण काढली जात आहे.

भारतासाठी १० मार्च हा क्रिकेट इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी भारताने १९७१ साली त्याकाळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदा पराभूत करण्याचा कारनामा केला होता. त्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात दुरानी यांनी क्लाईव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स या दिग्गज फलंदाजांना अनुक्रमे १५ आणि शून्य अशा धावसंख्येवर बाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला होता. या दोन विकेट्स भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. पुढे भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला होता.

यानंतर साल १९७३मध्ये इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा तिसरी कसोटी मद्रासमध्ये होणार होती. या प्रसिद्ध सामन्यातही दुरानी यांनी षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला होता. अशा या दुरानी यांच्या एका फोटोची सोशल मीडियावर सध्या फार चर्चा आहे.

या फोटोमध्ये ८६ वर्षांचे दुरानी एका खुर्चीवर बसले असून त्यांचे मागे एक लहान मुलगी उभी आहे. तसेच त्यांच्या मागे असलेल्या भिंतीवर त्यांच्या काही ट्रॉफी आणि क्रिकेट कारकिर्दीतील काही फोटो लावलेले आहेत. हा फोटो रामेश्वर सिंग यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

वेगवान अर्धशतक ठोकणारे दुरानी 

भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू सलीम दुरानी हे कसोटीमध्ये वेळेच्या तुलनेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी फेब्रुवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्ध कानपूर येथे खेळताना केवळ २९ मिनिटात अर्धशतक केले होते.

त्यांनी हे अर्धशतक भारताच्या दुसऱ्या डावात खेळताना केले होते. त्यावेळी त्यांनी त्या डावात एकूण ३४ मिनिटे फलंदाजी करताना नाबाद ६१ धावा केल्या होत्या. पण ते फलंदाजी करत असनाच सामन्याचे ५ मिनिटे संपले असल्याने ते ६१ धावांवर नाबद राहिले. या खेळीत त्यांनी ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते.

दुरानी यांच्या कारकिर्दीबद्दल थोडेसे…

भारतीय क्रिकेट इतिहासात असे काही खेळाडू आहेत ज्यांचा जन्म परदेशात झाला होता. त्यातील एक नाव म्हणजे सलीम दुरानी यांचे आहे. माजी क्रिकेटपटू सलीम दुरानी यांनी जवळपास १४ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले.

सलीम दुरानी त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानाची राजधानी काबुल येथे झाला होता. पण त्यानंतर त्यांचे पालन-पोषण गुजरातमधील जामनगरमध्ये झाला. येथूनच त्यांनी क्रिकेट शिकले. प्रथम त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळेल आणि नंतर १९६० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतासाठी पदार्पण केले. त्या सामन्यात त्यांनी १८ धावांची खेळी केली. तो सामना अनिर्णित राहिला.

प्रथम श्रेणीचे १७० सामने ते खेळले त्यात ८५४५ धावा केल्या तर २९ कसोटी सामन्यात १२०२ धावा केल्या आणि गोलंदाजीत ७५ बळी देखील घेतले. सलीम दुरानी १९७३ पर्यंत भारताकडून खेळले. शेवटचा सामना ते इंग्लंड विरुद्ध मुंबई येथे खेळले. त्यात पहिल्या डावात ७३ तर दुसऱ्या डावात ३७ धावा केल्या. हा सामना देखील अनिर्णित राहिला.

त्यांच्या कारकिर्दीत एक वेळ अशीही होती की त्यांना कारपूर येथे झालेल्या एका कसोटी सामन्यासाठी अंतिम ११ जणांमध्ये स्थान न मिळाल्याने चाहत्यांनी चक्क निदर्शने करत नाराजी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप: ‘लॉर्ड्स’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना

अन् रवी शास्त्रींनी ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरत जिंकली ‘ऑडी १००’, वाचा कहाणी वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिकेट १९८५ ची

टी२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठीही नरेंद्र मोदी स्टेडियमवरच नजर; ‘या’ ठिकाणांचाही होऊ शकतो विचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---