आयपीएलचा ११ वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ एक महिना राहिला आहे. या मोसमासाठी आयपीएलचे संघ नव्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे अनेक संघांचे कर्णधारही बदलले आहेत. आयपीएलचे २ वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स संघानेही आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाची जबाबदारी यावर्षी दिनेश कार्तिक या यष्टीरक्षक फलंदाजाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच रॉबिन उथप्पाचे नाव उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
With the much awaited announcement done, #KKRHaiTaiyaar with Dinesh Karthik as our Captain! ????????#KorboLorboJeetbo #IPL2018 pic.twitter.com/tIo3f8WYlr
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 4, 2018
याबद्दल आनंद व्यक्त करताना कार्तिक Live TV वर बोलताना म्हणाला, “कोलकाता संघ मागील १० वर्ष सातत्याने चांगला खेळला आहे. या संघाला वारसा ही चांगला आहे. या संघाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी आनंद आणि सन्मान आहे.”
तो पुढे म्हणाला, “आमच्याकडे युवा आणि अनुभवाचे चांगले मिश्रण आहे. आम्ही जॅक कॅलिस या प्रशिक्षकाच्या मार्दर्शनाखाली खेळणार आहोत. सगळे परदेशी खेळाडूही चांगले आहेत. आम्ही जिथून गौतम गंभीरने संघाला सोडले आहे तिथून संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू.”
कार्तिकला कोलकाताने जानेवारीमध्ये पार पडलेल्या लिलावात ७.४ कोटी देऊन संघात सामील करून घेतले होते. कार्तिकला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याने याआधी ५ संघांकडून आयपीएल खेळले आहे. यात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स संघाकडून तो खेळाला आहे.
कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५२ सामने खेळले असून यात त्याने २४.८१ च्या सरासरीने २९०३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १४ अर्धशतके केली आहेत. याबरोबरच यष्टीरक्षक म्हणून ८८ झेल आणि २६ यष्टिचित केल्या आहेत.
कार्तिकला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव देखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू संघाने २००९-१० मध्ये पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. तसेच मागील वर्षी झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत कार्तिकने इंडिया रेड संघाचे कर्णधारपद सांभाळले होते आणि त्याच्या नेतृत्वखाली इंडिया रेड संघाने दुलीप ट्रॉफीचे विजेतेपदही मिळवले आहे.
कोलकाता संघाचे कर्णधारपद मागील काही मोसम गौतम गंभिरकडे होते मात्र त्याला कोलकाता संघाने कायम न ठेवल्याने तसेच त्याला लिलावात परत संघात न घेतल्याने त्यांच्या संघाचे कर्णधारपद रिकामे होते. त्यामुळे त्यांनी दिनेश कार्तिककडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
कोलकाता संघाचे सीईओ वेंकी मैसूर म्हणले, ” आम्ही दूरचा विचार करून बदल केला आहे. आम्ही अशा खेळाडूच्या शोधात होतो जो गौतम सारखी संघाचे नेतृत्व करेल.”
कोलकाता नाईट रायडर्सने ट्विटरवरून त्यांच्या चाहत्यांना कार्तिकने दिलेल्या संदेशाचा व्हिडीओ शेयर केला आहे. कोलकाता संघ यावर्षी त्यांचा पहिला सामना ८ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध इडन गार्डन स्टेडियमवर खेळणार आहे.
Here's a message for all #KnightRiders from our Captain, @DineshKarthik ????#KorboLorboJeetbo pic.twitter.com/MNAvDM4tHp
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 4, 2018