---Advertisement---

‘मी फक्त सांगतोय!’ भारताचे दोन्ही यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने पुढे केला मदतीचा हात?

Dinesh Karthik
---Advertisement---

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर कोरोना व्हायरसचं संकट उभे राहिले आहे. गुरुवारी (१५ जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुष्टी केली की युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्यासह भारताचे तीन सदस्यही आयसोलेशनमध्ये आहेत. हे वृत्त समोर आल्यानंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या एका ट्विटने लक्ष वेधले आहे.

भारतीय संघातील दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये
बीसीसीआयने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे तो सध्या ज्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तिथे क्वारंटाईन आहे. त्याच्या पुढच्या २ कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याशिवाय त्याला भारतीय संघात सामील होता येणार नाही.

दुसरीकडे, भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये असलेले गरानी यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जुलै रौजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला येत्या २० ते २२ जुलैदरम्यान काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघातील पंत आणि साहा हे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आता सराव सामन्यात यष्टीरक्षण कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. तरी यासाठी केएल राहुल हा एक पर्याय भारताकडे आहे.

दिनेश कार्तिकचे कोड्यात टाकणारे ट्विट
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघाचे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज आयसोलेशनमध्ये असल्याची बातमी आल्यानंतर काहीवेळाने सध्या इंग्लंडमध्येच असणाऱ्या दिनेश कार्तिकने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नाव असलेली त्याची किटबॅग दिसत आहे. तसेच या किटबॅगवर त्याचे यष्टीरक्षणाचे ग्लव्ह्ज ठेवलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने ‘मी फक्त सांगतोय’ अशा अर्थाचे एक हॅशटॅग टाकले आहे.

कार्तिकच्या या ट्विटची सध्या चाहत्यांमध्ये बरीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी कयास लावला आहे की भारताचे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने भारतीय संघव्यवस्थापनाला तो देखील इंग्लंडमध्येच असून त्याचाही पर्याय कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे सुचवले आहे. तरी असे ट्विट कार्तिकने का केले आहे, याचा फक्त सध्यातरी चाहते अंदाजच लावत आहेत.

कार्तिक सध्या इंग्लंडमध्येच आहे. त्याने नुकतेच समालोचन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान समालोचन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

आर अश्विन-डॅनिएल वॅटमध्ये ट्विटरवर रंगलेल्या गमतीशीर संभाषणाने वेधले क्रिकेट चाहत्यांचे लक्ष

भारताविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी काउंटी इलेव्हन सज्ज, ‘या’ १४ खेळाडूंची संघात निवड

‘कुल-चा’ जोडी एकत्र म्हणजे मजामस्तीची खात्री! विराट, धोनीची नक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---