महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच, १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे.
आज महाराष्ट्र दिनी आपण क्रिकेटमधील असे काही मराठी खेळाडू पाहणार आहोत, ज्यांचा नावलौकिक आणि त्यांनी केलेले अनेक विक्रम-पराक्रम क्रिकेट इतिहासात अजरामर झाले आहेत.
या खास दिनानिमित्त या लेखात आपण फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११ पाहणार आहोत.
या लेखात आपण महाराष्ट्रातील खेळाडूंना घेऊन वनडेची इंडियाची ड्रीम ११ तयार करणार आहोत. यात आपण जे खेळाडू महाराष्ट्रात राहतात व मुंबई, महाराष्ट्र किंवा विदर्भाकडून क्रिकेट खेळले आहेत त्याचबरोबर भारताकडून त्यांनी क्रिकेट खेळले आहे, अशा खेळाडूंचा समावेश करणार आहोत.
१. रोहित शर्मा (कर्णधार)
भारताचा या क्रमांकावरील सौरव गांगुलीनंतरचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणजे हिटमॅन रोहित शर्मा. रोहितने वनडेत सलामीला येताना तब्बल १४६ सामन्यात पहिला चेंडू खेळताना टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. या क्रमांकावर त्याने १४६ सामन्यात २०११ ते २०२२ या काळात ५६.७१च्या सरासरीने ७३१६ सरासरीने धावा केल्या आहेत. या क्रमांकावर रोहित इतकी चांगली सरासरी असणारा भारतातील सोडा जगातील फलंदाज क्वचितच. रोहित मुंबई रणजी संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
२. सचिन तेंडूलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर जगातील कोणत्याही ड्रीम ११मध्ये असणारा खेळाडू. त्यामुळे या संघात सचिन नसेल असे होणार नाही. तरीही सचिनची या क्रमांकावरील कामगिरी पहाणे महत्त्वाचे आहे. सचिनने वनडेत दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २९५ सामन्यात ५०.३१च्या सरासरीने १३६८५ धावा केल्या आहेत. जगातील सचिन सोडून कोणत्याही फलंदाजाला या क्रमांकावर ७ हजारपेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. यावरुन सचिनची या क्रमांकावरील फलंदाजीचा तुम्हाला अंदाज येईल. त्यात सचिन- रोहित जोडी फलंदाजी करताना चाहत्यांना पर्वणीच ठरेल. सचिन देशांतर्गत क्रिकेट मुंबई संघाकडून खेळला.
३. विनोद कांबळी
भारताकडून विनोद कांबळीने १०४ सामने खेळले. यातील ३२ सामने वनडेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना कांबळीची सरासरी ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सरासरीपेक्षा जास्त होती. विनोद कांबळी, संजय मांजरेकर व दिलीप वेंगसरकर यांनी या क्रमांकवर भारताकडून खेळताना १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. परंतु वेंगसरकर हे कारकिर्दीतील बहुतांश सामने चौथ्या क्रमांकावर खेळले. तर वनडे क्रिकेटचा प्रकार पाहता मांजरेकरांपेक्षा कांबळीच या जागेसाठी योग्य वाटतात. कांबळींनी या स्थानावर वनडेत ३२ सामन्यात ३९.९६च्या सरासरीने १११९ धावा केल्या आहेत. कांबळी देशांतर्गत क्रिकेट मुंबई संघाकडून खेळले.
४. दिलीप वेंगसरकर
भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हे या अतिशय योग्य क्रिकेटपटू आहेत. कारकिर्दीतील १२९ वनडे सामन्यांपैकी ते ७४ सामने वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळले. त्यांनी या ७४ वनडेत ३७.५०च्या सरासरीने २१३८ धावा केल्या. या क्रमांवर भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ते चौथे असून त्यांनी या क्रमांकावर १६ अर्धशतक केली आहेत. १९८३ ते १९९०च्या काळात ते या क्रमांकावर खेळताना ७०चा चांगला स्ट्राईक रेट त्यांनी राखला आहे. वेंगसरकर देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळले.
५. फारुक इंजीनिअर (यष्टीरक्षक)
फारुक इंजीनिअर जरी भारताकडून ५ वनडे सामने खेळले असले तरी ते ज्या काळात खेळले त्यात खूपच कमी सामने होतं होते. १९७४ ते १९७५ या काळात ५ वनडे सामन्यांत त्यांनी ३८च्या सरासरीने ११४ धावा केल्या. समीर दिघे किंवा चंद्रकांत पंडीत इंजीनिअरपेक्षा जवळपास २० सामने जास्त खेळले परंतु त्यांची कामगिरी इंजीनिअर यांच्यापेक्षा तशी खूपच खराब राहिली. दिघे यांनी २३ सामन्यात २३च्या सरासरीने २५६ तर पंडित यांनी ३६ सामन्यात २०च्या सरासरीने २९० धावा केल्या. इंजीनिअर हे मुंबईकडून रणजी सामने खेळले.
६. केदार जाधव
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने या क्रमांकावर भारताकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. ७३ पैकी ४१ वनडे सामने केदार या क्रमांकावर खेळला आहे. यात त्याने ४९.८५च्या सरासरीने ९९७ धावा केल्या आहेत. २ शतकी व ३ अर्धशतकी खेळी केदारने या क्रमांकावर केल्या आहेत. तसेच त्याने भारताकडून गोलंदाजीत २७ विकेट्सही घेतल्या आहेत. केदार या क्रमांकावर एक चांगला अष्टपैलू म्हणून कामगिरी करु शकतो. तो महाराष्ट्र रणजी संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
७. रवी शास्त्री
भारताकडून रवी शास्त्री यांनी १५० वनडे सामन्यात एका चांगल्या फलंदाज व गोलंदाजाची भुमिका निभावली. ३१०८ धावा करताना त्यांनी १२९ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यांनी भारताकडून ६व्या व ७व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे. ७व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी ३२ सामन्यात २९.१५च्या सरासरीने ५८३ धावा केल्या आहेत. त्यांच्या या क्रमांकावर समावेश केल्यामुळे भारतीय फलंदाजीला एक खोली मिळेल. शास्त्री हे मुंबई संघाकडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे.
८. रमेश पोवार
भारताकडून रमेश पोवार ३१ वनडे सामने खेळले आहेत. महाराष्ट्रीयन फिरकी गोलंदाजांमध्ये सचिन तेंडूलकर, रवी शास्त्री व केदार जाधव यांनी चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांना या संघात आधीच समावेश केला आहे. परंतु एक पुर्णवेळ फिरकीपटू म्हणून पोवार यांनी बरी कामगिरी केली आहे. ३१ वनडे सामन्यांत त्यांनी ३५च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वेळप्रसंगी ते थोडीफार फलंदाजीही करु शकतात. रमेश पोवार देखील मुंबई संघाकडूनच रणजी सामने खेळला आहे.
९. अजित आगरकर
भारताचा तिसरा सर्वात यशस्वी वनडे गोलंदाज म्हणून अजिक आगरकरडे पाहिले जाते. भारताकडून खेळताना त्याने वनडेत १९१ सामन्यात २८८ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे १० वेळा त्याने ४ किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हे सगळं करताना गरज पडेल तेव्हा हा खेळाडू थोडीफार फलंदाजीही करायचा. त्यामुळे या क्रमांकासाठी आगरकर एवढा योग्य गोलंदाज नाही. आगरकर देखील मुंबई संघाकडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे.
१०. झहिर खान
विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला झहिर खान भारताकडून १९४ सामने खेळला आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तो कुंबळे, श्रीनाथ, आगरकरनंतर चौथ्या स्थानी आहे. २००० ते २०१२ या काळात वनडे कारकिर्द घडविणाऱ्या झहीरने २०० वनडे सामन्यांत २८२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आशिया ११ संघाकडून ६ सामने खेळताना चांगली कामगिरी केली आहे. तो काही सामने बडोदा तर काही रणजी सामने मुंबईकडून खेळला आहे.
११. उमेश यादव
विदर्भ रणजी संघातील पहिला खेळाडू, ज्याने भारताकडून क्रिकेट खेळले अशी ओळख असणारा उमेश यादव या संघातील वेगवान तोफखान्यातील एक महत्त्वाचा गोलंदाज असेल. ७५ वनडे सामने खेळलेल्या यादवने १०६ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०१० ते २०१८ या काळात तो हे वनडे सामने खेळला आहे. उमेश यादव विदर्भ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानकडून आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या फलंदाजांमध्ये बटलरच आहे ‘बॉस’, रहाणेलाही पछाडलं
‘तो’ झेल लखनऊसाठी होता खूपच महत्वाचा, पकडल्यानंतर कृणालने एकदा नाही, तर दोनदा केले किस