भारतातील कट्ट्या कट्ट्यांवर चर्चेचा चोथा करून टाकण्याचे विषय म्हणजे राजकारण, सिनेमा आणि क्रिकेट. देशातील एकही अशी टपरी नसेल किंवा सलून नसेल की, या गोष्टींच्या बारीकसारीक मुद्द्यांवर चर्चा झाली नसेल. त्यातली त्यात क्रिकेटबाबत तर सर्वच क्रिकेटपंडित बनून जातात. अगदी सचिनला सल्ला देऊन पांढरे झालेले काका आता विराटचा कव्हर ड्राईव्ह कसा फसतोय याचे विवेचन करताना दिसतील.
मात्र, कोणी कितीही क्रिकेट पंडित झाला तरी, डकवर्थ लुईस नियमाची उकल केलेला अपवादच असेल. असेच ‘बर्मुडा ट्रँगल’ सारखे क्रिकेटमधील एक रहस्य असलेल्या डकवर्थ लुईसच्या पहिल्या दर्शनाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. क्रिकेटप्रेमींनी डकवर्थ-लुईस हे नाव ऐकलं ते १९९२ क्रिकेट विश्वचषकात. हा तोच विश्वचषक ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरीच क्रांती घडवून आणली. पांढरा चेंडू, रंगीबिरंगी कपडे, काळी साईट स्क्रीन, पॉवर प्ले आणि बरच काही. त्याच वेळी ‘डकवर्थ लुईस’ या ९९.१ टक्के लोकांना माहीत नसणाऱ्या नियमाची चर्चा समीक्षकांमध्ये होती. बरं हा नियम ‘गेम चेंजर’ ठरणार असे देखील बोलले गेले. मात्र, मानवी वृत्तीनुसार एखादी गोष्ट घडून गेल्याशिवाय त्या गोष्टीची किंमत कळत नाही. नेमकं हेच घडलं.
सारा विश्वचषक अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात पार पडत होता. साखळी फेरीत जगाने चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण करत स्टंप उद्ध्वस्त करणारा जॉन्टी रोड्स आणि पहिल्या विश्वचषकात महानतेची झलक दाखवणारा सचिन पाहिला. बऱ्याच उलथापालथीनंतर अखेर इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहचले.
पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजत अंतिम फेरीत धडक दिली. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड या स्पर्धेतील डार्क हॉर्स ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे भिडणार होता. तारीख होती २२ मार्च. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसेल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विश्वचषकात बहुतांशी कर्णधार नाणेफेक जिंकून हाच निर्णय घेण्याला प्राधान्य देत होते. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसाठी एकटा ग्रीम हिक उभा राहिला. चार-दोन जीवदान मिळवत स्वतःच्या ८३ धावांच्या मदतीने त्याने इंग्लंडला २५२ पर्यंत पोहोचवले. अनेकांनी सामना तुफान फोर्ममध्ये चाललेला दक्षिण आफ्रिका संघच जिंकणार यावर पैजाही लावल्या. दक्षिण आफ्रिकेलाही आपला पहिला विश्वचषक खुणावू लागला होता.
अंतिम सामना खेळायचाच या इराद्याने मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने हडसन, कूपर, जोंटी आणि हॅन्सी क्रोनिएच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर विजयाकडे आगेकूच सुरू केली. दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूमध्ये २२ धावा हव्या असतानाच वरुणराजाचे आगमन झाले. बराच वेळ धो-धो पाऊस पडत राहिला. मात्र, ना टीव्ही समोरचे प्रेक्षक हलले ना मैदानावरील. अखेर लोकांचा संयम संपण्याच्या आत सामना सुरू होणार असल्याची घोषणा झाली. तत्पूर्वी, स्कोररने दक्षिण आफ्रिकेला किती चेंडूत किती धावा करायचे हे भल्यामोठ्या स्कोर बोर्डवर लिहिले.
स्कोररने त्यावेळी जे काही आकडे दर्शवले ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण, स्कोर बोर्डवर स्पष्ट आकडे दिसत होते १ चेंडू २१ धावा. दक्षिण आफ्रिकेचे समर्थक मंडळी म्हणत असतील “बाबा तू १ च्या पुढे ३ लावायचा विसरलास की काय?” कारण, एका बॉलमध्ये २१ धावा हे आव्हान साक्षात ब्रह्मदेवाला दिले तरी त्याला पेलवणारे नव्हते. मैदानावर दोन्ही संघांना कल्पना देण्यात आली हे काय आहे; आणि जगाने पहिल्यांदा डकवर्थ-लुईस हा शब्द ऐकला.
डकवर्थ-लुईस हे साधे-सरळ नाव आहे, इथपर्यंत सर्वांना समजले. पण, एकच नाव आहे की ते दोन, हा प्रश्न होता. त्यावेळी आतासारखं कोणीतरी लगेच गुगलकडे मदत मागण्याचा प्रश्नच नव्हता. तर, इंग्लंडमधील दोन संख्याशास्त्रज्ञ फ्रॅंक डकवर्थ व टोनी लुईस या दोन उच्चविभूषित व्यक्तींनी या जगावेगळ्या पद्धतीचा शोध लावला होता. क्रिकेट सामन्यात पाऊस आल्यास पहिल्या डावाची व दुसऱ्या डावाची काहीतरी गोळाबेरीज करून, सामन्याचा निकाल लावण्यासाठीची पद्धत म्हणून त्यांनी हा नियम एमसीसीकडे म्हणजेच, हे जगातील सर्व क्रिकेट नियमात बांधणाऱ्या संस्थेकडे, १९९२ मध्ये सादर केला होता. ज्याला एमसीसी व आयसीसीने अद्याप मान्यता दिली नव्हती.
ती पद्धत सांगणे इतके सोपे नाहीस त्यामुळे तो विषय जरा बाजूला राहू द्या. आपण आपल्या सेमीफायनलकडे येऊ. तर, अजून अधिकृत नसलेल्या नियमाने या दुसऱ्या सेमीफायनलचा निकाल लागणार होता. बरं त्यात अजूनही भरीस भर म्हणून, १ चेंडू २१ धावांच्या जागी स्कोररने १ चेंडू २२ धावा अशी दुरुस्ती केली. बरं ते २१ असो नाहीतर २२, दक्षिण आफ्रिकेचे अंतिम फेरीत खेळण्याची स्वप्न उध्वस्त होणार, हे त्रिकालबाधी सत्य होते. रडवेल्या चेहऱ्याने रिचर्डसन आणि मॅकमिलन मैदानात आले. तो एक चेंडू खेळला, एक धाव काढली, आणि इंग्लिश खेळाडूंशी हात मिळवत निघून गेले. इंग्लंडने ‘डकवर्थ-लुईस’ यांच्या कृपेने दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.
या पराभवाचा असा काही परिणाम दक्षिण आफ्रिका संघावर झाला की, मोठ्या स्टेजवर गटांगळ्या खाणारे ‘चोकर्स’ असा शिक्का त्यांच्यावर बसला तो कायमचा. पुढे असे अनेक विश्वचषक खेळले गेले. मात्र, सेमी फायनलच्या अखेरच्या षटकामध्ये असेच काहीतरी ‘नाट्य’ होऊन, दक्षिण आफ्रिका विश्वचषकाच्या अंतिम फेरीला मुकत राहिलाय. आणि, १९९२ पासून सुरू असलेले हे ‘डकवर्थ लुईस’चे चवीतचर्वणही काही कमी झाले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से