अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर नुकताच दिवस-रात्र कसोटी सामना पार पडला. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना होता. या सामन्यात भारताने १० विकेट्सने विजय मिळवत ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला दोन्ही डावात मिळून २०० धावा देखील करता आल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार इंग्लंड संघावर बरसला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने इंग्लंड संघाची दुसऱ्या डावात घाबरलेला सशासारखी अवस्था झाली होती असे म्हटले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात ११२ आणि दुसऱ्या डावात केवळ ८१ धावाच करता आल्या होत्या.
याबद्दल ‘स्काय स्पोट्स क्रिकेट पोडकास्ट’ मध्ये बोलताना हुसने म्हणाला, ‘इंग्लंड दुसऱ्या डावात घाबरलेल्या सशासारखे दिसत होते. मला वाटत नाही की ती ८१ धावांवर सर्वबाद होण्यासारखी खेळपट्टी होती. पण नक्कीच ही चेन्नईपेक्षा जरा अवघड खेळपट्टी होती.’
या सामन्यात अक्षर पटेल आणि आर अश्विन या भारतीय फिरकीपटूंनी मिळून इंग्लंडचे दोन्ही डावात मिळून १८ विकेट्स घेतल्या होत्या. अक्षरने एकूण ११ आणि अश्विनने ७ विकेट्स घेतल्या.
हुसेन म्हणाला, ‘विशेषत: अशा खेळपट्टीवर एक चेंडू वळण घेत असतो, तर एक चेंडू स्किड होत असतो, तुम्ही अशावेळी लय गमावता. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवरील सलग कसोटी सामने आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात.’
तसेच अक्षरचे कौतुक करताना हुसेन म्हणाला, ‘अक्षरने अचूक चेंडू टाकले. तो स्टंपवर गोलंदाजी करत होता. त्याचे काही चेंडू वळत होते तर काही चेंडू वळत नव्हते. त्याला फारसे न वळालेल्या चेंडूवर बऱ्याच विकेट मिळाल्या, त्यामुळे लोक म्हणतील की सरळ चेंडूंवर खेळता का येत नाही.’
त्याचबरोबर हुसेन म्हणाला, ‘हे सर्व मानसिकतेशी जोडलेले आहे. खरं सांगायचं तर खेळपट्टी आणि पंचांविषयी बहुतेक चर्चा बाहेर जात आहेत. इंग्लंड संघामधील कोणत्याही खेळाडूने परिस्थिती अयोग्य असल्याचे सांगितले नाही. त्यांना यातून मार्ग शोधावाच लागणार असून पहिल्या डावात जॅक क्रॉलीचे अर्धशतक सकारात्मक होते. आताही मालिका संपलेली नाही. भारताविरुद्धच्या २-२ ची बरोबरी देखील वाईट नसेल.”
या सामन्यात इंग्लंडला पहिल्या डावात ३३ धावांची पिछाडी स्विकारावी लागली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या डावात ८१ धावा करुनही भारतासमोर त्यांना ४९ धावांचेच आव्हान ठेवता आले. हे आव्हान भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता सहज पूर्ण केले होते.
अहमदाबादलाच होणार चौथा सामना –
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चौथा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र सामना नसेल, त्यामुळे सर्वसाधारण कसोटी सामन्याप्रमाणे सकाळीच सामन्याला सुरुवात होईल. हा सामना ४ ते ८ मार्च दरम्यान होणार आहे. तसेच या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले तब्बल १६.२५ कोटी
खुशखबर ! इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका पुण्यातच होणार, मात्र…






