इंग्लंडच्या क्रीडाप्रेमींसाठी ११ जुलै २०११ हा दिवस विसरण्यासारखा राहिला. इंग्लंडमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये इंग्लंडच्या संघांना पराभवाचा सामना करावा लागला. क्रीडाविश्वातील अत्यंत संयमित चाहते मानले जाणारे इंग्लंडचे चाहते या तिन्ही पराभवानंतर निराश झालेले दिसले. त्यातील युरो कप २०२० अंतिम सामन्यातील इटलीकडून झालेला पराभव इंग्लंडच्या लोकांच्या चिरकाल स्मरणात राहील.
विम्बल्डन अंतिम फेरीतील पराभूत
टेनिसविश्वातील अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. नील स्कूप्सकाली आणि त्याची अमेरिकन जोडीदार देसीरा क्रॅव्हझिक यांनी इंग्लंडच्या जो सॅलिसबरी आणि हॅरिएट डार्टचा सरळ सेटमध्ये ६-२, ७-६ असा पराभव केला.
भारतीय महिला क्रिकेट संघाने दिला इंग्लंड संघाला धक्का
इंग्लंड महिला क्रिकेट संघ व भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा टी२० सामना ११ जुलै रोजी खेळला गेला. एक वेळ इंग्लंड संघाचे या सामन्यात पारडे जड होते. मात्र, भारतीय महिला गोलंदाजांनी अखेरच्या चार षटकात टिच्चून गोलंदाजी करत आठ धावांनी विजय साजरा केला. या विजयासह तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे.
इंग्लंडने गमावला युरो कप
इंग्लंड संघाने फुटबॉल विश्वातील दुसरी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या युरो कपच्या अंतिम फेरीत प्रथम प्रवेश केला होता. लंडन येथील वेंबली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड दुसऱ्या मिनिटाला आघाडी घेतली होती. मात्र, इटलीने दुसऱ्या सत्रामध्ये बरोबरी साधली. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये गेलेल्या या सामन्यात इंग्लंडला इटलीने ३-२ असे पराभूत केले. १९६६ नंतर कोणतीही मोठी फुटबॉल स्पर्धा जिंकण्यात इंग्लंड संघाला अपयश आले आहे.
या तिन्ही पराभवामुळे इंग्लंडचे चाहते कमालीचे निराश झाले. युरो कप अंतिम सामन्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी काही इटालियन चाहत्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील समोर आले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या मालिकांआधी श्रीलंकेसाठी आली ‘ही’ आनंदाची बातमी