येत्या सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा उर्वरित हंगाम खेळले जाणार आहे. या स्पर्धेत कुठल्या देशातील परदेशी खेळाडू सहभाग घेतील याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. यापूर्वी इंग्लंड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या देशातील खेळाडू उर्वरित हंगामातील सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसणार आहेत. परंतु आता इंग्लंड संघातील खेळाडू आयपीएलच्या उर्वरित हंगामात खेळताना दिसून येऊ शकतात.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार होती. दोन्ही संघ ३ वनडे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार होते. परंतु ही मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंड संघातील मुख्य खेळाडू आयपीएल स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतात.
विशेष बाब म्हणजे, यापुर्वी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडला मायदेशात भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. १४ सप्टेंबर रोजी ही मालिका संपवून भारतीय संघ तेथूनच चार्टर्ड विमानाने युएईला रवाना होईल. अशात इंग्लंडचे सहभागी खेळाडूही याच विमानाने युएईला येणार असल्याचे समजत आहे.
दरम्यान इंग्लंड संघ १४-१५ ऑक्टोबर रोजी दोन टी-२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानला देखील जाणार आहे. मात्र अद्याप या मालिकेचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने ही जास्त चिंतेची बाब असू शकत नाही.
मुंबई-चेन्नई असणार आमने सामने
बीसीसीआयने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना ५ वेळेस आयपीएलचा विजेता संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध ३ वेळेस आयपीएलचा विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे आणखी ३१ सामने शिल्लक आहेत. हे सामने २७ दिवस अबू धाबी, दुबई आणि शारजहामध्ये खेळले जाणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी पहिला क्वालीफायर दुबईमध्ये; तर ११ ऑक्टोबर रोजी एलिमिनेटर शारजाहमध्ये खेळला जाणार आहे. तसेच दुसरा क्वालीफायर १३ ऑक्टोबरला शारजाह; तर १५ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.(England tour of Bangladesh postponed indefinitely)
कोरोनामुळे अर्ध्यातून आयपीएल २०२१ स्थगित
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नई सुपर किंग्स संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धाही युएईत
आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर युएईमध्ये आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. परंतु कुठल्या दोन संघांना पहिला सामना खेळायचा मान मिळेल? याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मयंक पहिल्या कसोटीतून बाहेर, सलामीसाठी ‘हे’ ३ पर्याय उपलब्ध; एक नाव अनपेक्षित
‘येथे जिंकण्याव्यतिरिक्त काहीही नको’, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे विराटने फुंकले रणशिंग
“त्याला कसोटी मालिकेत संधी मिळू शकते”, हार्दिकचा पर्याय म्हणून रहाणेने सुचविले युवा खेळाडूचे नाव