साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्याच दिवशी 60 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सामन्याच्या चौथ्या डावात 69.4 षटकात सर्वबाद 184 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून या डावात मोईन अलीने 4 विकेट घेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या डावात भारताने पहिल्या तीन विकेट झटपट गमावल्या होत्या. त्यानंतर मात्र कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची जोडी जमली. त्यांनी भारताचा डाव 3 बाद 22 धावांवरुन 101 धावांची शतकी भागिदारी करत सावरला.
परंतू हे दोघेही खेळपट्टीवर स्थिर झालेले असताना मोईन अलीने विराटला बाद करत ही जोडी फोडली. विराटचा अॅलिस्टर कूकने झेल घेतला. विराटने या डावात भारताकडून सर्वाधिक 130 चेंडूत 4 चौकारांच्या सहाय्याने 58 धावा केल्या.
विराट बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांनीही नियमिच अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. विराटला चांगली साथ देणारा रहाणेलाही अलीने पायचीत बाद केले. रहाणेने या डावात 153 चेंडूत 51 धावा करताना 1 चौकार मारला.
युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र तोही 11 धावांवर बाद झाला. तर त्याच्या आधी फलंदाजीसाठी 6 व्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला भोपळाही फोडता आला नाही.
भारताच्या अन्य फलंदाजांपैकी शिखर धवन(17), चेतेश्वर पुजारा(5), आर अश्विन(25), आणि मोहम्मद शमी(8) यांनी धावा केल्या. तर सलामीवीर फलंदाज केएल राहुलही शून्य धावेवर बाद झाला.
इंग्लंडकडून या डावात मोइन अलीने 71 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी जेम्स अँडरसन(2/33), बेन स्टोक्स(2/34), स्टुअर्ट ब्रॉड(1/23) आणि सॅम करन(1/1) यांनी विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी सामन्याच्या तिसऱ्या डावात इंग्लंडने चौथ्या दिवशी 8 बाद 260 धावांवरुन खेळायला सुरुवात केली होती. मात्र चौथ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने स्टुअर्ट ब्रॉडला शून्य धावेवर बाद केले.
त्यानंतर जेम्स अँडरसन आणि सॅम करनला 11 धावांचीच भर घालता आली. करन 83 चेंडूत 47 धावा करुन धावबाद झाला. त्याला इशांत शर्मा आणि रिषभ पंतने धावबाद केले.
भारताकडून सामन्याच्या तिसऱ्या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 57 धावात 4 विकेट्स घेतले. तर इशांत शर्माने 36 धावात 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने अनुक्रमे 85 आणि 51 धावात प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक-
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 246 धावा
भारत पहिला डाव – सर्वबाद 273 धावा
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 271 धावा
भारत दुसरा डाव – सर्वबाद धावा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही
–राशिद खान खेळणार या मोठ्या क्रिकेट लीगमध्ये
–१० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंड- विंडीजमध्ये होतेय अशी मालिका