मुंबई । पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौर्यावर आहे. या दौऱ्यापूर्वी पीसीबी स्पॉन्सरशिपच्या शोधात होता. नवा स्पॉन्सर न मिळाल्याने पाकिस्तान क्रिकेट संघ शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरणार होता. अत्यंत कमी पैशात पीसीबीने हे स्पॉन्सरशिप त्यांना दिले होते.
दरम्यान, पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा एक मोठा स्पॉन्सर मिळाला आहे. पेप्सी कंपनीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी पुन्हा एकदा करार केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत पाकिस्तानचा संघ पेप्सीच्या लोगोची जर्सी घालून खेळताना दिसून येईल.
पीसीबीचे कमर्शिअल डायरेक्टर बाबर हमीद याबाबतीत बोलताना म्हणाले,” पुढील बारा महिन्यांसाठी पेप्सी कंपनीने आमच्याशी करार केला आहे. 1990 पासून ही कंपनी आमच्यासोबत आहे. कंपनीने आमच्याशी करार केल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.”
पेप्सी कंपनीने पाकिस्तानच्या पुरुष संघासोबतचा जून 2021 पर्यंत करार वाढवला आहे. पुढील वर्षांपर्यंत पाकिस्तानचा संघ पेप्सीच्या लोगोची जर्सी घातलेला दिसून येइल.
पाकिस्तान क्रिकेटचा संघ जूनच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड पोहचताच खेळाडू चौदा दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये राहिले. 5 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तानचा संघ 3 टी 20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.