ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार, अशी अनेकांना अपेक्षा आहे.
भारतीय संघासाठी या मालिकेत सर्वात मोठा धोका असेल तो इंग्लंडचा कर्णधार जो रुट. पण केवळ रुटच नाही तर संपूर्ण इंग्लंड संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आज आपण या लेखात बघणार आहोत असे 4 इंग्लिश खेळाडू जे आगामी मालिकेत भारतीय संघासाठी ठरू शकताय डोकेदुखी.
1) बेन स्टोक्स –
बेन स्टोक्स हा अष्टपैलू खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. स्टोक्स हा खऱ्या अर्थाने मॅच विनर खेळाडू असून तो सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. 2020 वर्ष स्टोक्ससाठी फारच उत्तम राहिले. स्टोक्सने 2020 वर्षातील 7 सामन्यांत 58.27 च्या सरासरीने 641 धावा केल्या होत्या. यादरम्यान स्टोक्सने 2 शतकं आणि तितकेच अर्धशतक झळकावले होते. फलंदाजी सोबतच स्टोक्स गोलंदाजीत देखील शानदार फॉर्म मध्ये असून भारतीय संघाला त्याच्यापासून सावध रहावे लागणार आहे.
2) डॉम सिबली –
इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबलीकडे देखील भारताविरुद्ध शानदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. सिबलीची फलंदाजी तंत्र स्टीव स्मिथसारखीच आहे. सिबलीदेखील ऑफ-साइडपेक्षा ऑन साईडवर जास्त धावा करतो. अशा परिस्थितीत भारतीय गोलंदाजांना त्यांच्या विरुद्ध एक योग्य रणनिती आखावी लागेल. सिबलीसाठी सुद्धा 2020 वर्ष शानदार राहिले. त्याने 2020 मध्ये 9 सामन्यात 47.30 च्या सरासरीने 615 धावा केल्या होत्या.
3) स्टुअर्ट ब्रॉड –
भारतासाठी नेहमीप्राणेच यावेळी देखील स्टुअर्ट ब्रॉड मोठा धोका असणार आहे. ब्रॉड सध्या शानदार गोलंदाजी करत असून त्याचे चेंडूवरील नियंत्रण आणखीनच वाढले आहे. विषेश म्हणजे ब्रॉडने मागील 8 सामन्यात तब्बल 38 बळी मिळवलेले आहेत.
4) जेम्स अँडरसन –
जेम्स अँडरसनने नेहमीच भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळपट्टीवर जरी अँडरसनला इंग्लंडप्रमाणे स्विंग मिळवणार नसली तरी त्याच्याकडे अनुभवाची खाण आहे. अँडरसनने आतापर्यंत 157 कसोटी सामने खेळलेले असून त्यात तब्बल 606 बळी मिळवले आहेत. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात अँडरसनने पहिल्या डावात 40 धावा देत 6 बळी मिळवले होते. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा अँडरसनवर असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीसाठी टीम इंडियात निवड झालेले ३ महाराष्ट्रीयन खेळाडू
“…म्हणून धावा काढण्यापेक्षा चेंडू खेळून काढणे महत्वाचे असते”, चेतेश्वर पुजाराचे रोखठोक मत
बुमराहने केलेली नक्कल पाहून कुंबळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…