इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. खरंतर हा हंगाम नेहमीपेक्षा वेगळा आहे. कारण या हंगामापासून लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स असे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे संघांची स्पर्धेत खेळणाऱ्या संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. त्याचबरोबर या १० संघांचे दोन गट पडले असून त्यानुसार साखळी फेरी खेळवली जात आहे. पण याचबरोबर हा हंगाम यासाठीही वेगळा ठरतोय की आयपीएलमधील आत्तापर्यंतच्या १४ हंगामांपैकी मिळून तब्बल ९ विजेतीपदे ज्या दोन संघांच्या नावावर आहेत, ते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ सुरुवातीलाच गंटागळ्या खाताना दिसत आहेत.
चॅम्पियन संघांची निराशाजनक सुरुवात
आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) आत्तापर्यंत (६ एप्रिल) १४ सामने पूर्ण झाले आहेत. यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांनी प्रत्येकी ३ सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात पराभव पत्करला आहे. यंदा एमएस धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडल्याने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) नेतृत्व करत असलेल्या चेन्नईने आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध पराभव स्विकारले आहेत. तसेच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पराभव स्विकारले आहेत.
त्यामुळे सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खाली केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ आहे, ज्यांनी खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या हंगामात आत्तापर्यंत हे तीनच असे संघ आहेत, ज्यांना विजय मिळालेला नाही. विशेष म्हणजे २०१५ पासून आयपीएल हंगामांचा विचार केला, तर या तीन संघांशिवाय अन्य कोणत्याही संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. मात्र, १५ व्या हंगामात चॅम्पियन संघच अपयशी ठरताना दिसत आहेत.
पराभवाची कारणे
जर, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांना अपयश का येत असावे याचा विचार करायचा झाला तर, अनेक कारणे समोर येतात. चेन्नई सुपर किंग्ससमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे संघातील महत्त्वाचा गोलंदाज, ज्याला लिलावात चेन्नईने १४ कोटींहून अधिक रक्कम मोजली तो दिपक चाहर दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे चेन्नईची गोलंदाजी कमकूवत भासत आहे. तसेच शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडही आता संघात नाही. त्यामुळे वेगवान गोलंदांजीसाठी त्याच्याकडे ड्वेन ब्रावो हा एकमेव अनुभवी पर्याय उरला आहे. याचबरोबर सलामी जोडीही अपयशी ठरत आहे. एकूणच गतविजेती असलेली चेन्नई सुपर किंग्सला आता योग्य आणि उपलब्ध खेळाडूंमध्येच योग्य संघनियोजन करावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाल्यास मेगा लिलावामुळे संघात अनेक मोठी नावे यंदा दिसत नाहीत, त्याचीच कमतरता संघाला जाणवत आहे. मुंबईकडे जसप्रीत बुमराहशिवाय एकही विकेट घेईलच हा विश्वास देणारा गोलंदाज दिसून येत नाही. त्यामुळे बुमराह अपयशी ठरल्यास दुसरा कोणी त्याची कमी भरून काढेल असा विश्वासू गोलंदाज मुंबईकडे नाही, हीच मुंबईची सर्वात मोठी कमजोरी आहे. तसेच रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्याव्यतिरिक्त फलंदाजीत अनुभवाची कमीही दिसून येत आहे. त्याचमुळे यंदा मुंबई संघर्ष करताना दिसत आहे.
खडतर असेल पुढचा प्रवास
चारवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स यांच्या पुढील प्रवास सुरुवातीच्या पराभवांमुळे खडतर बनला आहे. यंदा आयपीएलमध्ये १० संघ जरी खेळत असले, तरी प्रत्येक संघ साखळी फेरीत १४ सामनेच खेळणार असून केवळ ४ संघच प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत.
संपूर्ण विचार करायचा झाल्यास यंदा १० संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. तसेच प्रत्येक संघ साखळी फेरीत १४ सामने खेळणार आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. तसेच दुसऱ्या गटातील एका संघाविरुद्ध दोन सामने आणि अन्य चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल, तर चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामने खेळेल.
तसेच कोणते संघ कोणाविरुद्ध २ सामने खेळणार आहे, हे ठरवण्यासाठी संघांनी जिंकलेल्या आयपीएल विजेतेपदांचा आणि संघांनी खेळलेल्या अंतिम सामन्यांचा विचार करण्यात आलेला आहे. या क्रमवारीतील सम आणि विषम संख्यांनुसार गट पाडण्यात आले आहेत.
आता आत्तापर्यंत झालेल्या सर्व आयपीएल हंगामांचा विचार करायचा झाल्यास असे लक्षात येते की, प्लेऑफमध्ये जाणाऱ्या संघाला किमान ७ ते ८ सामने तर जिंकावे लागतात. केवळ २०१९ ला याला सनरायझर्स हैदराबाद संघ अपवाद ठरला आहे. त्यावेळी या संघाने ६ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. पण हा एकमेव अपवाद सोडला, तर प्रत्येकवेळी गुणतालिकेत पहिल्या चार क्रमांकावर राहिलेल्या संघांनी किमान ७ सामने तर जिंकलेच आहेत.
त्यामुळे आता हा इतिहास लक्षात घेता मुंबई आणि चेन्नईला आयपीएलच्या १५ व्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर आता त्यांच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे. त्यांना अजून प्रत्येकी ११ सामने खेळायचे आहेत. यातील दोन सामने, तर ते एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे आता या दोन्ही संघांना पुढील आव्हान टिकवायचे असेल, तर किमान ७ ते ८ सामने जिंकावेच लागेल, त्याचबरोबर अन्य संघांचीही कामगिरी कशी होणार हे पाहावे लागणार आहे. कारण सध्या कोलकाताने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत, तसेच राजस्थान, पंजाब, लखनऊ, बेंगलोर या चार संघांनी ३ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर गुजरातने २ पैकी दोन्ही सामने जिंकले आहेत.
त्यामुळे आता मुंबई आणि चेन्नई यांना एकही चूक महागात पडू शकते. पण आत्तापर्यंत या दोन्ही संघांनी प्रत्येक हंगामात केलेली कामगिरी पाहिली, तर ते पुनरागमन करू शकतात हा विश्वासही चाहत्यांना आहे. चेन्नईने आत्तापर्यंत कधीही हंगामातील पहिल्या तिन्ही सामन्यांत पराभव पाहिला नव्हता, पण यंदा त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली आहे. पण असे असले तरी चेन्नईकडे असलेला अनुभव पाहाता हा संघ जोरदार पुनरागमन करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने यापूर्वी पुनरागमनचा चमत्कार करून दाखवला आहे. त्यांनी २०१५ साली पहिल्या ५ सामन्यात पराभव पत्करल्यानंतरही शानदार पुनरागमन करत विजेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच मुंबईने हंगामातील पहिले तीन सामने पराभूत होण्याही ही पहिलीच वेळही नाही. त्यांनी २०२२ आणि २०१५ व्यतिरिक्त २००८, २०१४ आणि २०१८ या तीन हंगामातही पहिले तीन सामने पराभव पाहिला आहे. या तीन हंगामांपैकी २००८ आणि २०१८ हंगामात मुंबई ५ व्या क्रमांकावर राहिले होते. तसेच २०१४ साली त्यांनी चौथा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
आता हे दोन चॅम्पियन संघ आयपीएलचा १५ वा हंगाम पुढे कसा खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल
‘मीच हैराण आहे’, मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळीबद्दल कमिन्सचे मोठे भाष्य
IPL2022| लखनऊ वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!