१२ मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्याचा अनुभव भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला मदत करेल, असे दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी म्हटले आहे.
रविवारी भारत दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बाऊचर म्हणाले की ‘जेव्हा तूम्ही भारतासारख्या देशाच्या दौर्यावर जाता, तेव्हा तुम्हाला संघातील युवा आणि अनुभवी खेळाडूंमध्ये समन्वय ठेवावा लागतो.’
‘मला वाटते फाफ वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी खरोखर चांगली कामगिरी करत आहे. तो जेव्हा शेवटचे खेळला होता, तेव्हा त्याने शतकी खेळी केली होती. त्याला भारतीय परिस्थिती चांगली माहिती आहे.’
बाऊचर यांनी पुढे असेही म्हटले आहे की डूप्लेसिसचे संघात पुनरागमन झाल्याने अंतिम ११ जणांचा संघ निवडताना संघव्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. पण अशी डोकेदुखी असणे चांगले आहे.
बाऊचर म्हणाले, ‘ही चांगली डोकेदुखी आहे. त्याच्या(डू प्लेसिस) संघात असण्याने खूप फायदा होईल. तसेच त्याचा अनुभव उपयोगी पडेल. आम्ही परिस्थिती पाहू आणि नंतर संघ संयोजन करू. तुम्हाला फाफ का पाहिजे आहे, कारण त्याने भारतीय परिस्थितीत खरोखरच चांगली कामगिरी केली आहे.’
डू प्लेसिस शेवटचा वनडे सामना २०१९ विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर तो वनडे क्रिकेट खेेळलेला नाही. पण त्याने टी२० क्रिकेट खेळले आहे.
भारत दौऱ्यावर येण्याआधी दक्षिण आफ्रिका संघाने त्यांच्या मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिका खेळली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ३-० असा विजयही मिळवला. याबद्दल बाऊचर म्हणाले, ‘आम्ही आत्ताच खूप चांगल्या संघाला पराभूत केले आहे. आम्हाला आत्मविश्वास हवा होता आणि यामुळे आम्हाला नक्कीच आत्मविश्वास मिळेल.’
तसेच भारतीय संघाबद्दल बोलताना बाऊचर म्हणाले, ‘भारताविरुद्ध खेळणे ही एक कठीण परीक्षा असणार आहे. येथे वेगवेगळी परिस्थिती असते. आमचे बरेच खेळाडू भारतात खूप क्रिकेट खेळलेले नाहीत.’
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी सोमवारी दक्षिण आफ्रिकेचा संघ धरमशाला येथे पोहचला आहे. धरमलाशा येथे पहिला सामना झाल्यानंतर १५ मार्चला लखनऊ येथे दुसरा वनडे सामना होईल. तर तिसरा वनडे सामना १८ मार्चला कोलकाता येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–दक्षिण आफ्रिका संघाला कोरोना व्हायरसची भीती, भारत दौऱ्यात टाळणार हस्तोंदलन