न्यूजीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टिम साउदी स्वतःच्या संघासाठी मागच्या वर्षी सर्वोत्तम प्रदर्शन करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. गुरुवारी (१४ एप्रिल) साउदीला सर रिचर्ड हॅडली पदकाने सन्मानित केले गेले. हे पदक संघासाठी वर्षभरात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपूला दिले जाते. २०२१ मध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी साउदीला या पदकाने सन्मानित केले गेले.
हा पुरस्कार सोहळा तीन दिवस चालला. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी टिम साउदी (Tim Southee) व्यतिरिक्त पेन किनसोलाला बर्ट सटक्लिफ पदकाने सन्मानित केले गेले. तसेच डेवॉन कॉनवेला वर्षातील सर्वश्रेष्ठ कसोटी क्रिकेटपटू निवडले गेले. मागच्या वर्षीचा सर्वत्कृष्ट देशांतर्गत महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार नँसी पटेलला मिळाला, तर सर्वोत्तम देशांतर्गत प्रदर्शनासाठी संयुक्तरित्या टॉम ब्रूस आणि राबी ओडोनेल यांची निवड केली गेली.
टिम साउदी सध्या आयपीएल २०२२ हंगामात कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. मागच्या वर्षभरात त्याने मायदेशता आणि विदेशात कसोटीसह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर त्याला या मानाच्या पदकाने सन्मानित केले गेले आहे. त्याने मागच्या वर्षी २३.८८ च्या सरासरीने ३६ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर पाहायला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात साउदीने ४३ धावा खर्च करून ६ विकेट्स नावावर केल्या होत्या.
त्याने भारताविरुद्ध आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात देखील उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. साउथँप्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या नावावर आतापर्यंत एकूण ३३८ कसोटी विकेट्सची नोंद झालेली आहे. न्यूझीलंडचे सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज हॅडलीपेक्षा तो ९३ विकेट्सने मागे आहे.
पदक मिळाल्यानंतर साउदी म्हणाला की, एवढा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणे सन्मानाची गोष्ट आहे. शाबासकी मिळणे चांगली गोष्ट आहे. यातून दिसते की आम्ही एका संघाच्या रूपात काम केले आहे आणि मोठ्या काळापासून क्रिकेट खेळत आलो आहोत, असे मला वाटते. यादरम्यान संघाचा भाग असणे चांगली गोष्ट आहे. सोबत स्वतःच्या देशाला सामना जिंकवून देणे विशेष बाब आहे.
सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालेला डेवॉन कॉनवे सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा