गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात पहिल्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. शुक्रवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल.
हिरो आयएसएल इतिहासात सर्वाधिक सातत्य राखलेला संघ म्हणून गोव्याचा उल्लेख केला जातो. विक्रमी सहाव्या वेळी या संघाने बाद फेरी गाठली आहे, पण त्यांना अद्याप एकदाही जेतेपद मिळविता आलेले नाही. अंतिम फेरीत दोन वेळा त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे.
आता या संघाचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकारण्याचे ध्येय आहे. त्यासाठी साखळीतील अव्वल क्रमांकाची ढाल मिळविलेल्या मुंबई सिटीला शह दिल्यास त्यांचे एक पाऊल पुढे पडलेले असेल.
गोव्याने सलग चौथ्यांदा बाद फेरीत धडक मारली आहे. यावेळी त्यांचा जेतेपदाचा विश्वास असेल. गोवा हा मनोरंजक खेळ करणाऱ्या संघांमध्ये अग्रभागी आहे. सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत मुंबईनंतर नॉर्थईस्ट युनायटेडच्या साथीत त्यांचा संयुक्त दुसरा क्रमांक आहे.
फॉर्म गोव्याच्या जमेची बाजू आहे. गेल्या 13 सामन्यांत हा संघ अपराजित आहेत. अशी कामगिरी हिरो आयएसएलच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला जमलेली नाही, पण मुंबई सिटीच्या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नसेल. अशावेळी जेतेपदापर्यंत घोडदौड करण्याचा निर्धार बाळगलेला आपला संघ शैलीशी ठाम राहून खेळेल अशी आशा गोव्याचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांना आहे.
फरांडो यांनी सांगितले की, आम्ही खेळाचा आनंद लुटला तर आम्हाला यश गवसेल. काही वेळा दडपण असते, कारण प्रत्येकालाच जिंकायचे असते. माझ्यादृष्टिने आमच्या खेळाडूंना आमच्या पद्धतीचा खेळ करावासा वाटणे महत्त्वाचे आहे. माझा संघ आमच्या शैलीप्रमाणे आक्रमक खेळ करीत नाही तेव्हा मी घाबरून जातो, याचे कारण अशा संघाला मदत करणे अवघड असते. अर्थात आमच्या खेळाडूंना उत्सुकतेने सहभागी व्हायचे असते आणि आमच्या शैलीशी ठाम राहून खेळायचे असते.
गोव्यासमोरील आव्हान खडतर झालेले असेल, याचे कारण इव्हान गोंझालेझ आणि अल्बर्टो नोग्युरा यांना निलंबनामुळे खेळता येणार नाही. चेंडूवरील ताब्याच्या बाबतीत गोव्याचा संघ 58 टक्क्यांसह आघाडीवर असला तरी मुंबई सुद्धा पिछाडीवर नाही. मुंबईची टक्केवारी केवळ एकने कमी आहे. चेंडूवर ताबा ठेवण्याच्या शैलीमुळे सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने तब्बल 35 गोल केले आहेत. या दोन संघांमधील आधीच्या लढतीच्यावेळी फरांडो यांनी सांगितले होते की, साखळीतील अव्वल क्रमांक हवा असल्यामुळे मुंबईवर दडपण असेल.
आता हा क्रमांक मिळविला असल्यामुळे लॉबेरा यांचा आपल्या आधीच्या संघाविरुद्ध आणखी काही सिद्ध करून दाखविण्याचा निर्धार असेल. लॉबेरा यांनी सांगितले की, मुंबई सिटीचा संभाव्य विजेते असा उल्लेख केला जातो तेव्हा मला आवडते, कारण ते आम्हाला सरस मानतात. आमच्यासाठी हे चांगले आहे. मला हे दडपण आवडते, पण आम्हाला मैदानावर क्षमता सिद्ध करून दाखवावी लागेल.
फरांडो यांच्याप्रमाणेच लॉबेरा यांना सुद्धा आपल्या संघाने दडपण न घेता खेळाचा आनंद लुटावा असे वाटते. ते म्हणाले की, हा सामना विशेष आहे. आम्हाला धुर्तपणे खेळावे लागेल आणि 180 मिनिटांसाठी सज्ज राहावे लागेल. यातील पहिले पाऊल उद्या टाकायचे आहे. आम्ही रोमांचित झालो आहोत. आव्हानाला सामोरे जाण्याचा आनंद आम्ही लुटू अशी आशा आहे.
मुंबई सिटीचा अमेय रानवडे निलंबनामुळे खेळू शकणार नाही, पण ह्युगो बुमूस चार सामन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बार्सिलोना क्लबचे माजी अध्यक्ष बार्तोमेओ यांना अटक, बार्सागेट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल
आयएसएल २०२०-२१: अकरा गोलांच्या थरारात ओदीशाची ईस्ट बंगालवर मात