गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात साखळीतील अव्वल क्रमांकाचा बहुमान मुंबई सिटीनेच पटकावला. रविवारी अखेरच्या साखळी लढतीत एटीके मोहन बागानला 2-0 असा शह देत मुंबई सिटीने धडाक्यातच या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ही लढत झाली. मुंबई सिटीकडे मध्यंतरास 2-0 अशी आघाडी होती. ती त्यांनी अखेरपर्यंत अबाधित राखली. सातव्याच मिनिटाला बचाव फळीतील सेनेगलच्या मुर्तडा फॉल याने संघाचे खाते उघडले. 39व्या मिनिटाला आघाडी फळीतील नायजेरियाच्या 36 वर्षीय बार्थोलोम्यू ओगबेचे याने संघाचा दुसरा गोल केला.
साखळीतील पहिली लढत मुंबई सिटीने 1-0 अशी जिंकली होती. या लढतीपूर्वी मुंबई सिटी तीन गुणांनी पिछाडीवर होता. त्यामुळे त्यांना विजय अनिवार्य होता. स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने धडाकेबाज खेळ करीत हे यश खेचून आणले. स्पेनच्याच अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीके मोहन बागानला अखेरपर्यंत निर्णायक चाल रचता आली नाही.
मुंबई सिटीने 20 सामन्यांत 12वा विजय मिळविला असून चार बरोबरी व चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 40 गुण झाले. एटीके मोहन बागानला 20 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. 12 विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 40 गुण कायम राहिले. यात गोलफरक, केलेले गोल आणि एकमेकांविरुद्धची कामगिरी अशा सर्वच निकषांवर मुंबई सिटी सरस ठरला. मुंबईचा गोलफरक 17 (35-18), तर एटीके मोहन बागानचा 13 (28-15) असा होता.
खाते उघडण्याची शर्यत मुंबई सिटीने सातव्याच मिनिटाला जिंकली. फ्री किकवर हा गोल झाला. मध्यरक्षक अहमद जाहु याने डावीकडे मिळालेल्या फ्री किकवर पलिकडील बाजूला चेंडू मारला. त्यावर मुर्तडाने अचूक टायमिंगसह फिनिशींग केले.
सामन्याच्या 39व्या मिनिटाला मुंबई सिटीला फ्री किक मिळाली. मध्यरक्षक हर्नान सँटाना याने नेटच्या दिशेने अफलातून फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारला लागला. त्याचवेळी दक्ष असलेल्या ओगबेचे याने हेडिंगवर फिनिशींग केले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल
आयएसएल २०२०-२१: अकरा गोलांच्या थरारात ओदीशाची ईस्ट बंगालवर मात
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सला हरवित नॉर्थईस्ट युनायटेडची बाद फेरीत धडक