मुंबई । शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई कबड्डी उपनगर ह्या स्पर्धेचे आयोजक असून यात कबड्डीमधील अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील.
या स्पर्धेसाठी बहुतेक संघांनी तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. त्यातील अनेक खेळाडूंची जन्मतारीख ही १९९० नंतरचीच आहे. परंतु या स्पर्धेत सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून कर्नाटक संघाचा एस जिवा कुमार खेळताना दिसेल. त्याची जन्मतारीख १ जून १९८१ असल्याचे मुंबई उपनगरच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
ह्या खेळाडूने प्रो-कबड्डीच्या सर्व मोसमात मिळून एकूण ७४ सामने खेळले असून त्यात एकूण १५५ गुण मिळवले आहे. सर्वाधिक गुण टॅकलमधून घेणाऱ्या खेळाडूंमध्ये जीवा कुमार १०व्या क्रमांकावर आहे.
५व्या मोसमात या खेळाडूने युपी योद्गाजकडून खेळताना २२ सामन्यात ४४ गुण टॅकलमधून घेतले होते. नितेश कुमारनंतर ही युपीकडून या विभागातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च कामगिरी राहिली होती.
अन्य वयस्कर खेळाडूंमध्ये मंजीत चिल्लर (हरियाणा, १९८३), अनुप कुमार (हरियाणा, १९८३) आणि प्रशांत कुमार राय (कर्नाटक, १९८४) ह्या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ह्याच खेळाडूंकडे स्पर्धेत सर्वांचे लक्ष असणार आहे.