शुक्रवारी (६ जुलै) फिफा विश्वचषकाच्या उपांत्य पूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेल्जियमने ब्राझीलचा पराभव करत २०१८ फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात बेल्जियमने पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलचा २-१ अशा फरकाने पराभव केला.
पहिल्या हाफच्या पहिल्या दहा मिनिटात आक्रमक खेळ करत ब्राझीलला गोल करण्याची दोनदा संधी मिळली होती मात्र त्या संधीचे ब्राझीलला सोने करता आले नाही.
मात्र १३ व्या मिनिटाला बेल्जियमला कॉर्नर किक मिळाली आणि ब्राझीलचा घात झाला.
या कॉर्नर किकवर ब्राझीलच्या फर्नांडिन्होने ओन गोल केला आणि बेल्जिअमला १-० अशी आघाडी मिळाली.
या धक्यांतून ब्राझील सावरायच्या आत बेल्जियमच्या केविन डि ब्रूनने ३१ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या हाफ प्रमाणे दुसऱ्या हाफमध्येही ब्राझीलने आक्रमक खेळ केला मात्र त्यांच्या हाती जास्त काही यश लागले नाही.
पहिल्या हाफमध्ये २-० ने पिछाडीवर असलेल्या ब्राझीलच्या रेनातो अगस्तोने ७३ व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलच्या आशा पुन्हा जाग्या केल्या.
इंजुरी टाइममध्ये ब्राझीलच्या नेमारला गोल करण्याची संधी मिळली होती मात्र तो त्यामध्ये अपयशी ठरला.
संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ करणाऱ्या ब्राझीलने महत्वाच्या सामन्यात मात्र कच खाल्ली. या पराभवाबरोबरच ब्राझीलचे २०१८ फिफा विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
या सामन्यातीलल विजेता बेल्जियम संघ मंगळवारी (१० जुलै) उपांत्य सामन्यात फ्रान्सला लढत देईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-नेमार टीकेचा धनी; विश्वचषकात एकच चूक केली तब्बल ३ वेळा
-अखेर दिओगो मॅरेडोनांची ती शंका खरी ठरली?