भारत आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर 17 सामने झाले आहेत. यात भारताची कामगिरी अत्यंत खराब आहे. आतापर्यंत सर्व लढती भारतात झाल्या आहेत, पण भारताला अद्याप एकही विजय मिळालेला नाही. आता चीनच्या संघाच्या त्यांच्याच देशात म्हणजे ड्रॅगनच्या भूमीत मुकाबला करण्यासाठी भारतीय संघ दाखल होत असताना आशेला वाव आहे.
बेंगळुरू एफसीचा मध्यरक्षक एरीक पार्तालू याने सांगितले की, चीनविरुद्धचा सामना भारतासाठी चांगला ठरू शकेल. त्यांचे काही खेळाडू निवृत्त होत आहेत, तर काही नवे खेळाडू येत आहेत. त्यामुळे त्यांचा संघ स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यांच्याविरुद्ध भारताने खेळण्याची गरज आहे, कारण पुढील वर्षी अमिरातीमध्ये अशा प्रकारच्या प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जायचे आहे.
भारतच नव्हे तर चीनमधील स्थानिक फुटबॉल पार्तालू याच्यासाठी नवा नाही. याचे कारण तो 2013 मध्ये चायनीज सुपर लिगमध्ये तियानजीन टीइडेए संघाकडून खेळला होता. पार्तालू ऑस्ट्रेलियाचा आहे. भारतीय फुटबॉलमधील प्रभावी परदेशी खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. या खेळाच्या प्रगतीचा तो साक्षीदार ठरला आहे.
पार्तालू 32 वर्षांचा आहे. त्याने सांगितले की, भारतीय फुटबॉलने मोठी वाटचाल केल्याच मला वाटते. गेल्या पाच वर्षांत असे चित्र दिसते. क्रमवारीतील भारताची वेगवान प्रगती प्रत्येकाच्या चर्चेचा विषय आहे. चीनने गेल्या 20 वर्षांत अशीच मजल मारली आहे.
चीनच्या फुटबॉलची सुत्रे मार्सेलो लिप्पी यांच्याकडे आहेत. 2006 मध्ये इटलीला विश्वकरंडक जिंकून दिलेल्या संघाचे ते प्रशिक्षक आहेत. चायनीज सुपर लिगसाठी (सीएसएल) मातब्बर खेळाडू करारबद्ध करून त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.
चीनचा संघ जागतिक क्रमवारीत 76व्या क्रमांकावर आहे. भारतापेक्षा हा संघ 21 क्रमांक वर आहे. यानंतरही भारत यजमान संघाला झुंजवू शकतो असे वाटणाऱ्यांमध्ये माजी भारतीय कर्णधार ज्यो पॉल अंचेरी याचाही समावेश आहे.
अंचेरीने सांगितले की, चीनमध्ये ही लढत होणार असल्यामुळे भारतीय संघाला चांगला अनुभव मिळेल. हा मित्रत्वाचा सामना आहे, पण भारतीयांनी झोकून देऊन खेळावे. याचे कारण आशियाई करंडकाच्या तयारीसाठी ही लढत होत आहे. भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे आणि कोणत्याही संघाविरुद्ध झुंजार खेळ करू शकतो. जमेच्या आणि कमकुवत बाजूंचा चांगला अंदाज घेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
पार्तालू याच्यामते अपेक्षा उंचावल्या आहेत. याचे कारण गेल्या पाच वर्षांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारतीय फुटबॉलमध्ये दर्जात्मक सुधारणा झाली आहे. तो म्हणाला की, आयएसएलच्या तुलनेत सीएसएल जास्त काळापासून सुरु आहे.
सीएसएलमध्ये ज्या प्रचंड प्रमाणावर आर्थिक रक्कम दिली जाते ते पाहणे थक्क करणारे आहे. त्यांना असा ओघ कायम राखता येईल का असे तुम्हाला नेहमीच वाटत राहते. आयएसएलमध्ये सुद्धा सुरवातीला बराच पैसा होता, पण आता ही मंडळी धुर्त झाली आहेत.
कारकिर्दीच्या अंतिम टप्यात असलेल्या खेळाडूंना प्रचंड पैसा देण्याने भारतीय फुटबॉलला दिर्घकालीन फायदा होणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे. तुम्ही सीएसएलचा दृष्टिकोन पाहिला तर त्यांच्या स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या स्वरुपात फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून येईल, पण बऱ्याच अॅकॅडमी उभ्या राहिल्या आहेत. पुढे जाऊन एक सोनेरी पिढी उदयास येऊ शकते.
सिडनीत जन्मलेल्या पार्तालू याला भारतीय फुटबॉल योग्य मार्गावर असल्याचे आणि अपेक्षित निकाल विलंबाने नव्हे तर नजिकच्या काळातच येतील असे वाटते. पार्तालूने सांगितले की, सीएसएलच्या तुलनेत आयएसएलचा दृष्टिकोन तेवढा आक्रमक नाही, पण यशाच्यादृष्टिने वास्तववादी आहे. अशीच वाटचाल करीत राहिल्यास भारतीय फुटबॉलसाठी ते हितावहच ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या:
- हैद्राबाद कसोटीसाठी मयंक अगरवालला संधी न दिल्याने टीम इंडियावर उठली टीकेची झोड
- कर्णधार विराट कोहली पुन्हा नाराज, ही गोष्ट क्रिकेटमध्येच नको
- पुन्हा विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये या मुद्द्यावरुन वाद?