तळागाळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या ‘खेलो इंडिया’ प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वाधिक रक्कम देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात, क्रीडा मंत्रालयासाठी 3,442.32 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. यापैकी खेलो इंडियासाठी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षातील 880 कोटी रुपयांच्या सुधारित वाटपापेक्षा 20 कोटी रुपये अधिक आहे. यावर्षी पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्सला अजून दोन वर्षे बाकी आहेत.
खेलो इंडियामध्ये सरकारने मोठी गुंतवणूक केली
गेल्या आर्थिक वर्षात क्रीडा मंत्रालयाचे बजेट 3,396.96 कोटी रुपये होते. अर्थात यापूर्वीच्या बजेटच्या तुलनेत यंदा क्रीडा मंत्रालयासाठी केवळ 45.36 कोटी रुपये जास्त देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत सरकारने खेलो इंडियामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, कारण याद्वारे देशाच्या सर्व भागांतील खेळाडूंमधील प्रतिभा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात खेलो इंडियासाठी प्रत्यक्ष वाटप 596.39 कोटी रुपये होते. त्यापुढील वर्षाच्या (2023-24) अर्थसंकल्पात हा आकडा 1,000 कोटी रुपये इतका होता. मात्र, नंतर यात सुधारणा करून 880 कोटी रुपये करण्यात आले.
खेलो इंडियाच्या खेळाडूंचा भारतीय ऑलिम्पिक संघात समावेश
खेलो इंडिया युथ गेम्स 2018 लाँच झाल्यापासून, सरकारने आणखी क्रीडा स्पर्धा जोडणे सुरू ठेवले आहे. मंत्रालयाने 2020 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स लाँच केले आणि त्याच वर्षी खेलो इंडिया हिवाळी गेम्स आणि 2023 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स लाँच केले. प्रतिभावान नवोदित खेळाडूंना सुविधा देण्याच्या उद्देशाने देशभरात शेकडो खेलो इंडिया स्टेट ऑफ एक्सलन्स सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे, खेलो इंडियाच्या अनेक खेळाडूंचा सध्या भारतीय ऑलिम्पिक संघात समावेश आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे बजेटही वाढले
राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या सरकारी मदतीतही 15 कोटींची वाढ करण्यात आली आहे. हे 2023-24 मधील 325 कोटी रुपयांवरून ताज्या अर्थसंकल्पात 340 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे बजेटही 795.77 कोटी रुपयांवरून 822.60 कोटी रुपये करण्यात आले आहे. त्यात 26.83 कोटींची वाढ झाली आहे. देशभरातील स्टेडियम्सची देखभाल करण्याव्यतिरिक्त, साई (SAI) जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना तयार करण्यासाठी टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना देखील आयोजित करते.
महत्वाच्या बातम्या-
“एक दिवस शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल”, माजी फलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
मुंबई क्रिकेट असोसिएशनला मिळाला नवा अध्यक्ष,संजय नाईक यांचा दारुण पराभव