भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने एक चेंडू व 6 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे मालिका आता बरोबरीत आली आहे. मात्र, फिरकी गोलंदाजांसाठी लक्षात राहणाऱ्या या सामन्यात एक अनपेक्षित घटना घडली.
ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरली. कारण, येथे एकही फलंदाज खुलेपणाने खेळू शकला नाही. संपूर्ण सामन्यात टाकल्या गेलेल्या 239 चेंडूंपैकी 179 चेंडू फिरकीपटूंनी टाकले. विशेष म्हणजे टी20 क्रिकेट ज्या षटकारांसाठी ओळखले जाते, ते षटकार या सामन्यात लागले नाहीत. भारतात झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये ही पहिलीच घटना राहिली, जेव्हा दोन्ही संघांकडून एकही षटकार ठोकला गेला नाही. न्यूझीलंडकडून या सामन्यात सहा चौकार तर भारताकडून आठ चौकार खेळले गेले. भारतातील एका टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मारले गेलेले हे सर्वात कमी चौकार आहेत.
लखनऊ टी20 चा विचार केल्यास न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. शिवम मावी वगळता भारताच्या सर्वच गोलंदाजांनी बळी मिळवत न्यूझीलंडला 8 बाद 99 असे रोखले. न्यूझीलंडसाठी कर्णधार मिचेल सॅंटनरने सर्वाधिक 19 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारत सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, सॅंटनरच्या कुशल नेतृत्वाने व सर्वच फिरकी गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीने त्यांनी भारतीय संघाला अखेरच्या क्षणापर्यंत झुंजवले. सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी चिवट फलंदाजी करताना 31 धावांची भागीदारी करून संघाला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. नाबाद 26 धावांची खेळी करणारा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला. मालिकेतील अखेरचा सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.
(First time in history both the teams hit no sixes in a T20i match in India India v Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊ टी20 नंतर संतापला कॅप्टन हार्दिक! म्हणाला, “टी20 मध्ये तुम्ही अशा खेळपट्ट्या देता?”
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास