इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात एक वेळ पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत ४६६ धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यामुळे इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान मिळाले. यानंतर इंग्लंडने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र भारतीय संघाने पुन्हा या सामन्यात पुनरागमन केले आणि चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केले. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.
या दरम्यान भारतीय संघाने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ज्यामध्ये भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात भारतीय संघाने पहिल्यांदाच कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडच्या ४ फलंदाजांना त्रिफळाचीत (बोल्ड आउट) केले आहे. ज्यामध्ये हसीब हमीद, ओली पोप, जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार जो रूट यांचा समावेश होता.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ १९१ धावाच बनवू शकला होता. ज्यानंतर इंग्लंडने २९० धावा करून ९९ धावांची आघाडी मिळवली होती. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघ बॅकफूटवर पडला होता.
मात्र या मालिकेतील तिसरा आणि चौथा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. ज्यामध्ये रोहित शर्मा(१२७), चेतेश्वर पुजारा(६१), शार्दुल ठाकुर(६०), रिषभ पंत(५०), केएल राहुल(४६) आणि विराट कोहली(४४) यांनी शानदार खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघाने ४६६ धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान दिले.
यानंतर इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी नंतर इंग्लिश फलंदाजांचा पूर्ण धुव्वा उडवला. सलामीचे फलंदाज सोडल्यास इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी देखील करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला २१० धावांत गुंडाळले. त्यामुळे भारताने हा सामना १५७ धावांनी आपल्या खिशात टाकला आणि मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली.
भारतीय गोलंदाजांमध्ये दुसऱ्या डावात उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
–जडेजाने इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच कोहलीने हातानं वाजवली पिपाणी, फोटो तुफान व्हायरल
–इंग्लिश धरतीवर ‘या’ भारतीय कर्णधारांनी जिंकलेत कसोटी सामने, ३ विजयांसह विराट अव्वल
–‘ओव्हल’चा विजय साधासुधा नाहीये; जो पराक्रम आजवर पाकने तीनदा केलाय, तोच भारताने पहिल्यांदाच केलाय