क्रिकेटमध्ये नेहमी मोठी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक होते. तसेच त्यांच्यात असलेल्या सामंजस्याचीही चर्चा केली जाते. पण काही अशाही फलंदाजांच्या जोड्या आहेत ज्यांनी मोठे विक्रम तर केले आहेत, मात्र त्यांच्यात एकेरी-दुहेरी धावा घेतानाचे सामंजस्य तितकेसे बरे नाही. किंवा फार वाईट आहे. त्यामुळे धावा घेण्यासाठी पळताना अनेकदा त्यांच्यात गोंधळ उडतो. तसेच अनेकदा गमतीशीर घटनाही होतात. अशाच एकेरी-दुहेरी धावा घेताना चांगले सामंजस्य नसलेल्या ५ जोड्यांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. विराट कोहली आणि रोहित शर्मा –
सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची गणना होते. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. एवढेच नाही तर एकमेकांबरोबर खेळताना त्यांनी वनडेत ८० डावात ४८७८ धावांची भागीदारीही केली आहे. मात्र जेव्हा एकेरी-दुहेरी धावांसाठी धावतानाचा विचार केला जातो, त्यावेळी मात्र विराट आणि रोहितमधील सामंजस्यात गोंधळ उडतो.
विराट खेळताना अनेकदा एकेरी-दुहेरी धावांवर लक्ष देत असतो. तो त्यासाठी अग्रही असतो. तसेच धावा घेताना तो चपळाईने धावतोही. मात्र रोहितची तेवढी गती नसते. तसेच रोहित आक्रमक फटके मारण्याकडे लक्ष देतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात एकेरी दुहेरी धावा घेताना गोंधळ उडालेला आहे.
विशेष म्हणजे रोहितने वनडेत द्विशतक केलेल्या ३ खेळींपैकी २ द्विशतकावेळी विराट त्याच्याबरोबर फलंदाजी करताना धावबाद झाला आहे. २०११ ते २०१८ दरम्यान विराट आणि रोहित एकत्र फलंदाजी करत असताना त्यांच्यातील १ जण धावबाद होण्याची घटना ७ वेळा घडली आहे.
२. सनथ जयसुर्या आणि रोमेश कालुविथरना –
श्रीलंकेच्या सनथ जयसुर्या आणि रोमेश कालुविथरनाने सलामीवीर फलंदाजांच्या भूमीकेत मोठा बदल घडवून आणला. त्यांनी सलामीलाही आक्रमक फलंदाजी केली जाऊ शकते हे दाखवून दिले. त्यांच्या फलंदाजीने श्रींलेकेला अनेक मोठे विजय मिळवता आले. मात्र असे असले तरी त्या दोघांमधील धावांसाठी धावतानाचे सामंजस्य चांगले नव्हते. १३ वेळा त्यांच्यातील १ जण ते एकत्र फलंदाजी करत असताना धावबाद झाले आहे.
३. कुमार संगकारा आणि तिलत्करने दिल्शान –
श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंची जेव्हाही चर्चा केली जाईल तेव्हा कुमार संगकारा आणि तिलत्करने दिल्शान यांचे नाव नेहमी घेतले जाईल. त्यांनी अनेकदा त्यांच्या संघासाठी महत्त्वाची खेळी केल्या आहेत. तसेच श्रीलंका क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी अनेकदा एकमेकांबरोबर फलंदाजी केली आहे. त्यांनी १०८ वनडे डावात ५४७५ धावांची भागीदारी केली आहे. मात्र असे असले तरी एकत्र फलंदाजी करताना वनडेमध्ये ८ वेळा त्यांच्यातील १ जण धावबाद झाले आहे.
४. फाफ डू प्लेसिस आणि एबी डिविलियर्स –
दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि एबी डिविलियर्स जरी लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र असले तरी मात्र धावा काढताना त्यांच्यात खास असे सामांजस्य नाही. त्या दोघांनी त्यांच्या फलंदाजीने मोठे कारनामे केले आहेत. मात्र एकत्र फलंदाजी करत असताना त्या दोघांनी वनडेत ४५ डावात १७३५ धावा केल्या आहेत. पण यामध्ये ८ वेळा त्यांच्यातील १ जण धावबाद झाला आहे.
५. अर्जूना रणतुंगा आणि अरविंदा डि सिल्वा –
एकेरी आणि दुहेरी धावा करताना चांगले सामंजस्य नसणारी श्रीलंकेची आणखी एक जोडी म्हणजे अर्जूना रणतुंगा आणि अरविंदा डि सिल्वा. त्यांना वैयक्तिकरित्या श्रीलंकेकडून अनेक मोठे पराक्रम केले आहेत. मात्र एकत्र फलंदाजी करत असताना अनेकदा धावांसाठी पळताना त्यांच्यात गोंधळ झाला आहे.
ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र फलंदाजी करत असताना १४ वेळा त्यांच्यातील १ जण धावबाद झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या जोडीमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद व्हायचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.
ट्रेंडिंग लेख –
अशी आहे सनरायझर्स हैद्राबादची दमदार ड्रीम ११, हा खेळाडू आहे कर्णधार
आयपीएल इतिहासात प्रत्येक हंगामात सर्वात महागडा ठरलेला भारतीय खेळाडू
खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील