भारतीय संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत होता. मात्र, आता त्याने दमदार पुनरागमन केले असून तो सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे, त्याने आशिया चषकात शतकही झळकावले. असे असले तरी, त्याने यापूर्वी केलेल्या प्रदर्शनामुळे आजही त्याचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये घेतले जाते. अशात विराट कोहली शनिवारी (दि. ०5 नोव्हेंबर) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. या खास क्षणी विराटच्या सर्वोत्तम खेळींविषयी जाणून घेऊया…
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 26209 धावा केल्या असून यामध्ये त्याच्या 78 शतकांचाही समावेश आहे. चला तर विराटच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या पाच सर्वोत्कृष्ट खेळींविषयी…
1. श्रीलंकेविरुद्ध नाबाद 133 धावा (2012, होबार्ट) – विराटने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियात सीबी तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध खेळलेली ही खेळी त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने 86 चेंडूत 133 धावा केल्या होत्या. विराटने केलेल्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात अवघ्या 37 षटकांमध्ये 321 धावा केल्या होत्या. विराटने या सामन्यात लसिथ मलिंगाची चांगलीच धुलाई केली होती आणि हा अनेक दिवसांसाठी हा एक चर्चेचा विषय ठरला होता. विराटने या सामन्यात मलिंगाच्या एकाच षटकात तब्बल 23 धावा ठोकल्या होत्या.
2. पाकिस्तानविरुद्ध 183 धावा (2022, एशिया कप) – ढाकामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोहलीने अप्रतिम आणि महत्वाची खेळी केली होती. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी कली आणि 329 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संघ मैदानात आल्यानंतर सलामीवीर गौतम गंभीर शून्य धावांवर बाद झाला.
कर्णधार विराटने यानंतर डाव सांभाळला. विराटने या सामन्यात 22 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 183 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या आहे. विराटने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताने सामन्यात 48 षटकात विजय मिळवला.
3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावा (2016, टी-20 विश्वचषक) – विराट कोहली 2016 या संपूर्ण वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने यावर्षी टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली होती. हा सामना मोहाली क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला होता. या सामन्यात विराटने जेम्स फॉकनरची चांगलीच धुलाई केली होती. विराटने या सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी केली होती.
4. इंग्लंडविरुद्ध 149 धावा (2018, बर्मिंघम) – साल 2018 मध्ये भारताने केलेल्या इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये विराटने अप्रतिम प्रदर्शन केले होते. विराटने या दौऱ्यात बर्मिंघममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात 149 धावांची महत्वाची खेळी केली होती. या सामन्यात विराटव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. इतर कोणताच भारतीय फलंदाज 26 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. कोहलीने या सामन्यात गोलंदाजांची अवस्था वाईट केली होती आणि त्याच्या 149 धावा पूर्ण केल्या होत्या.
5. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 115 धावा (2014, ऍडलेड) – विराटने ऍडलेड येथे झालेल्या कसोटी सामन्यातही पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात 115 धावांची महत्वाची खेळी केली होती, जी त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी सामन्यात पहिल्या डावात विराटने ही महत्वाची खेळी केली आणि त्याच्या जोरावर भारतीय संघाने 444 धावा केल्या होत्या. हा सामना पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाने 48 धावांनी जिंकला होता.
हेही वाचा-
थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास, तोही ‘किंग’ कोहलीचा…!!!
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी, एक नजर टाकाच






