आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा होती. परंतु तसे होताना दिसत नाहीये. शनिवारी (दि. २४ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद झाला. याच पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सवर समालोचकाच्या भूमिकेतली इरफान पठाण, आकाश चोप्रा आणि हरभजन सिंग यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून शतकी खेळी करण्याच्या प्रयत्नात आहे, पण त्याला हे अद्याप जमलेले नाहीये. यादरम्यानच्या काळात त्याने अनेकदा अर्धशतकी खेळी केली, परंतु चाहत्यांना त्याच्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत. आयपीएल २०२२मधील त्याचे प्रदर्शन तर खूपच निराशाजनक राहिले आहे. चालू हंगामातील सुरुवातीच्या ८ डावांमध्ये त्याला एकदातरी अर्धशतक करता आले नाहीये. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ४८ राहिली आहे, तर दोन वेळा तो शून्य धावसंख्येवर बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने समालोचन करताना विराटच्या खराब फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली. तो म्हणाला की, “मी विराटसोबत खेळलो आहे, पण कधीच विचार केला नव्हता की, त्याचा एवढा वाईट काळ देखील येईल. दोन वेळा गोल्डन डकवर बाद होणे समजण्याच्या पलीकडचे आहे.”
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा म्हणाला की, “विराट कोहलीला नक्कीच त्याच्या फलंदाजीवर विचार करावा लागेल. तसेच, माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या मते, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांवर गोलंदाजांनी वर्चस्व केले.”
विराटच्या चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शनाचा विचार केला, तर तो ५ वेळा १० चेंडूंचा सामना करण्याआधीच बाद झाला आहे. हे आयपीएल २००८ नंतर त्याचे सर्वात खराब प्रदर्शन आहे. चालू हंगामातील ८ डावांमध्ये त्याने १७च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३ होता आणि त्याच्या बॅटमधून ९ चौकार, तर २ षटकार निघाले आहेत. असे असले, तरी विराट आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने एका आयपीएल हंगामात ९०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा