भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राजला काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
पण आता या प्रकरणाबाबत अनेक खूलासे होत आहेत. मितालीनेही बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.
आता भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांनीही डायना एडलजी यांच्यावर दुटप्पी वागण्याचा आरोप केला आहे.
एडुलजी यांनी मितालीला उपांत्य सामन्यासाठी संघातून वगळण्याबाबत ‘कोणीही संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्न विचारु शकत नाही’ असे विधान केले होते.
पण आता आरोठे यांनी म्हटले आहे की एडुलजी यांची ही भूमीका जूलैमध्ये एशिया कपच्या अंतिम सामन्यानंतरच्या विधानापेक्षा अगदी विरुद्ध आहे.
याबद्दल आरोठे टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना म्हणाले, ‘मितालीला वगळणे हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय असे म्हणून एडलजी त्यांच्या विधानाच्या विरुद्ध का बोलत आहेत? मग त्यांनी मलेशियामध्ये झालेल्या एशिया कपच्या वेळी संघ निवडीमध्ये हस्तक्षेप का केला होता? त्यावेळीही संघ व्यवस्थापनाने अंतिम सामन्यात पुजा वस्त्राकारला वगळण्याचा निर्णय घेतला होता.’
‘त्या स्पर्धेनंतर मी आणि त्या दौऱ्यावेळी संघ निवड सदस्य शशी गुप्ता आणि कर्णधार हरमनप्रीत कौरला एडलजी यांच्याकडून संमन्स बजावण्यात आले होते. तसेच त्यांनी वस्त्राकरला एशिया कपच्या अंतिम सामन्यात का घेतले नाही असे विचारले होते.’
‘त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितले होते की मी खेळण्यासाठी कोणाला निवडायचे हे ठरवू शकत नाही.’
‘आता तीन महिन्यांनतर एडलजी, ज्यांनी संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला होता, त्याच त्यांच्या विधानाविरुद्ध बोलत आहेत. मग त्यावेळी संघव्यवस्थापनाला असे प्रश्न का विचारण्यात आला? त्यात आत्ता बदल का? त्यांना या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल.’
त्याचबरोबर आरोठे यांनी सांगितले की वस्त्राकारला त्यावेळी अंतिम सामन्यावेळी वगळण्यात आले होते कारण तीने खूप झेल सोडले होते. त्या कारणामुळे आम्ही बांगलादेश विरुद्धचा सामनाही पराभूत झालो होतो.
या एशिया कप स्पर्धेनंतर काही भारतीय वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षक बदलण्याची मागणी केल्याने आरोठे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल