रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील आपले दोन्ही सामने जिंकले. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध तब्बल 228 धावांनी जिंकला. हा भारताचा पाकिस्तानविरुद्ध वनडेतील सर्वात मोठा विजय होता. तसेच, आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 12 सप्टेंबर रोजी 41 धावांनी पराभवाचा धक्का दिला. असे असले, तरीही भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने म्हटले आहे की, श्रीलंकेविरुद्धचा विजय हा पाकिस्तानपेक्षाही मोठा आहे. त्याने यामागील कारणही सांगितले आहे. चला तर, जाणून घेऊयात…
काय म्हणाला गंभीर?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते, या विजयामुळे भारतीय संघाला जास्त आत्मविश्वास मिळेल. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, “हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा होता. आपण पाकिस्तानविरुद्ध 228 धावांनी विजय मिळवला होता, परंतु या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास जास्त वाढेल. फलंदाजीबाबत संशय नव्हता. जसप्रीत बुमराह दुखापतीतून पुनरागमन करत होता. त्यामुळे त्याच्याविषयी थोडी शंका होती. यानंतर कुलदीप यादव आणि इतर गोलंदाज होते. मात्र, या खेळपट्टीवर परिस्थिती पाहता 213 धावसंख्येचा बचाव करणे नक्कीच कौतुकास्पद आहे.”
सामन्याचा आढावा
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 213 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक 53 धावा केल्या होत्या. तसेच, श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना दुनिथ वेललागे (Dunith Wellalage) याने जबरदस्त गोलंदाजी करत 40 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त चरिथ असलंकानेही 18 धावा खर्चून 4 विकेट्स घेतल्या. महीश थीक्षणाच्या वाट्याला एक विकेट आली.
मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. श्रीलंका संघ 41.3 षटकात फक्त 172 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी दुनिथने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने नाबाद 42 धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त फक्त धनंजय डी सिल्वा यानेही 41 धावांची खेळी साकारली. मात्र, इतर फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यामुळे सलग 13 सामने जिंकत असलेल्या श्रीलंकेची विजयी मालिका खंडित झाली. (former cricketer gautam gambhir says india s win over sri lanka more convincing than pakistan)
हेही वाचा-
गंभीरच्या मुखातून MS Dhoniचे तोंडभरून कौतुक; ‘हिटमॅन’चे नाव घेत म्हणाला, ‘धोनीमुळेच आज रोहित शर्मा…’
ही दोस्ती तुटायची नाय! श्रीलंकेविरुद्ध पाहायला मिळाला रोहित-विराटचा ब्रोमान्स; एकमेकांवर प्रेमाची उधळण- Video