जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकावी लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेची चर्चा सुरू आहे. मात्र, यादरम्यान रोहित शर्मा याच्यासोबत डावाची सुरुवात कोण करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अशात भारताकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक युवा फलंदाज शुबमन गिल आणि दुसरा म्हणजे केएल राहुल होय.
मागील वर्षीपर्यंत केएल राहुल (KL Rahul) हा भारतीय संघाचा नियमित सलामीवीर होता. मात्र, शुबमन गिल (Shubman Gill) याला संधी मिळाली, तर तो विक्रमांचा रतीब घालून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनाही विचार करण्यास भाग पाडू शकतो. असे गिलच्या आकडेवारी आणि त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मावरून दिसून येते. अशातच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही या मुद्द्यावर त्याचे विचार मांडले आहेत. चला तर हरभजन काय म्हणालाय जाणून घेऊया…
शुबमनचा राहुलपेक्षा कमी कसोटीत भाग
केएल राहुल याने 2022मध्ये एकूण 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 17.12च्या सरासरीने फक्त 137 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. मात्र, युवा फलंदाज गिलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 3 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1 शतक ठोकत 178 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही 29.66 इतकी राहिली आहे. याव्यतिरिक्त त्याने नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो सलामीवीर म्हणून पहिला पर्याय असू शकतो.
‘राहुलची तिन्ही क्रिकेट प्रकारात खराब कामगिरी’
हरभजन सिंग याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “मला रोहित शर्मा याच्यासोबत सलामीच्या रूपात शुबमन गिल याला पाहायला आवडेल. तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्या फॉर्मवर नजर टाकत त्याला संधी दिली पाहिजे. कारण, 2 महिन्यांनंतर तो या फॉर्ममध्ये नसूही शकतो. मात्र, राहुलकडेही ती क्षमता आहे. त्याच्याकडे ते सर्व आहे, जे एका फलंदाजाकडे असायला पाहिजे. मात्र, वनडे, टी20 आणि कसोटीतील आकडे राहुलसोबत नाहीयेत.”
तो म्हणाला की, “शुबमनची सलामीवीर म्हणून आकडेवारी केएल राहुलपेक्षा चांगली आहे. भारताला मालिका जिंकायची असेल, तर रोहितसोबत शुबमन गिलला उतरवले पाहिजे. मी हेच सांगेल की, भारताने चांगली सुरुवात करावी. कारण, इतक्या धावा केल्यानंतर असा खेळाडू अंतिम अकरामध्ये असला पाहिजे. एका सामन्यापुरते नाही, तर संपूर्ण मालिकेसाठी. मी हेच म्हणेल की, संघ व्यवस्थापनाने योग्य निर्णय घ्यावा आणि शुबमन गिल याला खेळवावे.”
हरभजनने शुबमन गिलविषयी केलेले वक्तव्य संघ व्यवस्थापन किती मनावर घेतंय? आणि गिलला संधी देतंय का नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer harbhajan singh picks shubman gill to open with rohit sharma in place of kl rahul for border gavaskar trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
देशासाठी काहीपण! 26 जानेवारीला केले लग्न, आता हनीमून सोडत ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यास पोहोचला नागपुरात
कंगाल पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ओकली भारताबद्दल गरळ; जे काय म्हणाला, त्याने तळपायाची आग जाईल मस्तकात