यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान या देशांमध्ये टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ सदस्ययी संघाची घोषणा केली आहे. याबरोबरच बीसीसीआयने एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले आहे की धोनी टी२० विश्वचषकादरम्यान मार्गदर्शक (मेंटर) म्हणून भारतीय संघाबरोबर असणार आहे. याबद्दल बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.
"Former India Captain @msdhoni to mentor the team for the T20 World Cup" – Honorary Secretary @JayShah #TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
धोनीने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून भारताला ३ आयसीसीच्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द
धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने २०१३ सालामध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २२४ धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ८२९ विकेट्स घेतल्या आहेत.
असा आहे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, अश्विनचे ४ वर्षांनी पुनरागमन, तर शिखरला वगळले
पंतप्रधान म्हणून सचिन आणि धोनी यांच्यात कोणाला निवडशील? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर






