भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जून महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात फक्त कसोटी आणि वनडे संघाचीच निवड करण्यात आली होती. या संघात चेतेश्वर पुजारा याला कसोटी संघातून बाहेर केले. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खान याच्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले. यानंतर चाहत्यांपासून ते आजी-माजी खेळाडूंपर्यंत अनेकांनी निवडकर्त्यांवर टीकास्त्र डागले. अशात आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने सरफराज खान याला पाठिंबा दिला आहे.
गांगुलीने घेतला आक्षेप
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने सरफराज खान (Sarfaraz Khan) याला पाठिंबा दर्शवला. त्याने सरफराजला पुन्हा एकदा दुर्लक्षित केल्यामुळे आक्षेप घेतला. गांगुलीने बंगालचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन यालाही त्या युवा खेळाडूंपैकी एक सांगितले, ज्यांचा कसोटी संघात विचार केला गेला पाहिजे होता.
सरफराजविषयी काय म्हणाला गांगुली?
माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाला की, “मला वाटते की, यशस्वी जयसवाल याने रणजी ट्रॉफी, ईराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खूप जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे तो संघात आहे. मला सरफराजसाठी वाईट वाटते. त्याने मागील तीन वर्षात जेवढ्या धावा केल्या आहेत, त्यासाठी त्याला संधी मिळायला पाहिजे होती. तसेच, अभिमन्यू ईश्वरन याच्यासाठीही हीच गोष्ट आहे. मला आश्चर्य आहे की, दोघांना संघातून हटवले आहे, पण त्यांना भविष्यात संधी मिळाली पाहिजे. माझ्या दृष्टीने जयसवाल एक चांगली निवड आहे.”
वेगवान गोलंदाजीविरुद्ध समस्या नाही
गांगुलीने सरफराजला दिल्ली कॅपिटल्समध्ये क्रिकेट संचालक म्हणून काम करताना जवळून पाहिले आहे. तो या समजामुळे खुश नाहीये की, सरफराज वेगवान गोलंदाजीविरुद्ध खेळू शकत नाही. तो म्हणाला, “जर तुम्ही त्याला वेगवान गोलंदाजीविरुद्ध खेळवत नसाल, तर तुम्हाला कसे माहिती? जर त्याला समस्या असती, तर तो चारही बाजूंना एवढ्या धावा करू शकला नसता. मला वैयक्तिकरीत्या वाटते की, त्याला वेगवान गोलंदाजीविरुद्ध काहीच समस्या नाहीये. त्याला संधी दिली गेली पाहिजे.”
खरं तर, रणजी ट्रॉफी 2022-23दरम्यान 8 सामन्यात फलंदाजी करताना अभिमन्यू ईश्वरन याने 66.50च्या सरासरीने 798 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, सरफराजने 92.66च्या शानदार सरासरीने 556 धावा केल्या होत्या. आता भविष्यात या फलंदाजांना भारतीय संघात संधी मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (former indian captain sourav ganguly supports sarfaraz khan should get chance for team india)
महत्वाच्या बातम्या-
‘मी दिनेश कार्तिकला मनात नाही तसलं बोललो…’, भारत-पाक सामन्याबाबत अश्विनचा धक्कादायक खुलासा
KKRच्या गोलंदाजाचा दुलीप ट्रॉफीत राडा, अवघ्या 75 चेंडूत ठोकलं वादळी शतक; कोण आहे तो?