भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपल्या धाकड प्रदर्शनाने सर्वांची बोलती बंद केली. त्यांच्या या प्रदर्शनामागे एक नाव भारतीय होते. ते म्हणजेच अजय जडेजा. भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याने विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्याचे सल्ले अफगाणिस्तानसाठी फायदेशीर ठरले होते. अशात जडेजाने अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम जादरान याच्या पुस्तक वाचण्याच्या सवयीचा खुलासा केला. यावेळी त्याला आठवले की, कशाप्रकारे त्याने एकदा या सलामीवीराला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे पुस्तक वाचताना पाहिले होते.
इब्राहिम जादरान (Ibrahim Zadran) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले होते. तो अफगाणिस्तानकडून स्पर्धेच्या इतिहासात शतक ठोकणारा पहिला फलंदाजही बनला होता. त्याने 9 सामन्यात 47च्या सरासरीने 1 शतक आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 376 धावा केल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना अजय जडेजा (Ajay Jadeja) याने इब्राहिम जादरानविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “इब्राहिम जादरान अफगाणिस्तान संघातील इतर खेळाडूंपेक्षा खूपच वेगळा आहे. त्याला वाचणाची खूप आवड आहे. एके दिवशी मी त्याला सचिन तेंडुलकर याचे पुस्तक वाचताना पाहिले. मी त्याला म्हटले की, जेव्हा आपण मुंबईत पोहोचू, तेव्हा मी सचिन तेंडुलकर याच्यासोबत मीटिंग फिक्स करण्याचा प्रयत्न करेल.”
खरं तर, विश्वचषक 2023 (CWC23) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत होणाऱ्या सामन्यापूर्वी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने स्वत: जाऊन अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी चर्चा केली होती. तसेच, त्यांच्या शानदार प्रदर्शनाचेही कौतुक केले होते.
विश्वचषक 2023मध्ये अफगाणिस्तानने अनेक संघांना दिली होती मात
हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने स्पर्धेच्या 13व्या हंगामात दोन पराभवासह सुरुवात केली होती. सर्वांना वाटले की, यावेळीही संघ निराश करेल, पण त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी आपला पहिला विजय बलाढ्य इंग्लंडविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करला, पण नंतर त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स संघाला पराभूत करत विजयाची हॅट्रिक केली.
साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवता आले नाही. मात्र, त्यांनी स्पर्धेच्या इतिहासातील आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. गुणतालिकेत अफगाणिस्तान 9 सामन्यांतील 4 विजय आणि 5 पराभवांसह 8 गुण मिळवत सहाव्या स्थानी विराजमान झाला होता. (former indian cricketer ajay jadeja shares interesting story about afghanistan s opener about ibrahim zadran)
हेही वाचा-
मॅक्युलमला झाली IPL इतिहासातील पहिल्या शतकाची आठवण; म्हणाला, ‘त्या शतकाने माझे आयुष्य बदलले, मला कुणीही…’
INDvsSA: भारताविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेतून बावुमाला का बसवलं बाहेर? हेड कोचने सांगितलं मोठं कारण