भारतीय संघातील जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. हा विक्रम त्याने अवघ्या 11 सामन्यांत केला होता. तर त्याचबरोबरच इरफान पठाण, हरभजन सिंगनंतर कसोटीमध्ये हॅट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. तसेच त्याला डेथ ऑव्हर्समधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही ओळखले जाते. परंतु माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे असे म्हणणे आहे की, बुमराहपेक्षा मोहम्मद सिराजकडे अधिक चांगले गोलंदाजी कौशल्य आहे.
आशिष नेहरा यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “गेल्या तीन-चार वर्षात प्रत्येकजण जसप्रीत बुमराहच्या कामगिरीबाबत त्याचे कौतुक करताना दिसत आहे. तसा तो एक चांगला गोलंदाज आहे यात काही शंका नाही. पण जर तुम्ही कौशल्याबद्दल बोलाल तर माझ्या दृष्टीने सिराज कोणत्याही बाबतीत बुमराहपेक्षा कमी नाही.”
पुढे ते म्हणाले की, “काही असे गोलंदाज असतात की ज्यांना तुम्ही फक्त टी -20 किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळवता. पण सिराजकडे कौशल्याची कमी नसल्यामुळे तो क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात चांगली गोलंदाजी करू शकतो. तसेच त्याचा गोलंदाजीत विविधता असल्याने या बाबतीत तो बुमराहपेक्षा पुढे आहे.”
तसेच पुढे बोलताना नेहरा म्हणाले की, “सिराजच्या गोलंदाजीत वेग असून त्याला वेगवेगळ्या प्रकारची कमी गतीची गोलंदाजीही करता येते. तसेच त्याला नविन चेंडू स्विंगही करता येतो. फक्त त्याने गोलंदाज म्हणून आपल्या तंदुरुस्ती आणि चपळपणा यावर लक्ष दिले पाहिजे. त्याने जर असे केले तर त्याच्यासाठी सारे आभाळ मोकळे असून तो खूप पुढे जाऊ शकतो.”
सिराजने आयपीएल 2021 मध्ये आत्तापर्यंत 4 सामने खेळले असून यामध्ये त्याने 6.06 च्या इकोनॉमी रेटने एकूण 5 बळी मिळवले आहेत. यामध्ये 27 धावांत 3 बळी हे त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले आहे.
यंदाच्या आयपीएल मोसमातील राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केली होते. या सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्स संघातील जोश बटलर, डेविड मिलर आणि राहुल तेवातिया या महत्त्वपूर्ण फलंदाजांचे बळी घेतले होते. तर सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 25 धावा देऊन दोन बळी घेतले होते. दुसरीकडे बुमराहने यंदाच्या आयपीएल मोसमातील 5 सामने खेळले असून यामध्ये 4 बळी घेतले आहेत.
सिराजने मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने दोन आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले होते. या वेगवान गोलंदाजाने आत्तापर्यत एकूण पाच कसोटी सामने खेळले असून यामध्ये 16 बळी मिळवले आहेत. तर तीन टी -20 सामने खेळले असून यामध्ये तीन बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुला साराची शप्पथ चांगला खेळ’, सचिनचा Rumoured जावई फलंदाजीत सपशेल फ्लॉप; सारा झाली ट्रोल
RRvKKR: ४ षटक, ४ विकेट्स; ख्रिस मॉरिसचे पैसावसूल प्रदर्शन; कर्णधाराने ‘या’ शब्दांत केलं कौतुक
केकेआरचा पराभवाचा ‘चौकार’, कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली निराशा; सांगितली कुठे झाली चूक






