गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा टी२० सामना भारताने ८ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. भारताचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव या अटीतटीच्या सामन्याचा नायक ठरला. मात्र पंचांच्या सॉफ्ट सिग्नलमुळे त्याच्या झंझावती खेळीला अनपेक्षित ब्रेक लागला. त्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हादेखील सॉफ्ट सिग्नलचा बळी ठरला. त्यामुळे वाद निर्माण झाला असून माजी भारतीय क्रिकेट इरफान पठान याने सॉफ्ट सिग्नलवरुन पंचांना टोमणा मारला आहे.
माजी अष्टपैलू इरफानने यासंदर्भात ट्विट करत लिहिले आहे की, ‘तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध असूनही सॉफ्ट सिग्नलचा निर्णय दिला जातो. हे म्हणजे, आपल्याजवळ ठाकूर आहे पण तो शोलेमधल्या ठाकूरसारखा आहे, असे झाले.’
सूर्यकुमार यादव ठरला सॉफ्ट सिग्नलचा बळी
चौथ्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सूर्यकुमार १४ व्या षटकात ५७ धावांवर खेळत होता. हे षटक सॅम करन टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारने फाईन लेगवरुन मोठा फटका मारला. पण तिथे असणाऱ्या डेविड मलानने तो चेंडू चपळाईन झेलला.
मात्र त्याने चेंडू झेलल्यानंतर तो चेंडू जमीनीला टेकला की नाही हे तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आले. मात्र तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या बाजूंनी चेंडू जमीनीला लागला की नाही हे पाहिल्यानंतरही संभ्रम कायम राहिला. त्यामुळे अखेर मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला असल्याने सूर्यकुमारला विकेट गमवावी लागली.
वॉशिंग्टन सुंदरबद्दलही पंचांचा वादग्रस्त निर्णय
यानंतर शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने मोठा फटका खेळला. मात्र बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या आदिल राशिदने त्याचा झेल घेतला. मात्र याचवेळी त्याचा पाय बाऊंड्री लाईनच्या अगदी जवळ असल्याने त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला की नाही हे तपासण्यात आले.
https://twitter.com/IrfanPathan/status/1372821682641981445?s=20
मात्र, तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी खुप वेळ तपासल्यानंतरही त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला की नाही याबद्दल कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याने आणि मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला असल्याने त्यालाही ४ धावांवर आपली विकेट गमवावी लागली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! कॅप्टन कोहलीने २०२० मध्येच दिले होते ‘या’ धुरंधरच्या निवडीचे संकेत, स्वत:च केला खुलासा
नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवा रंग, खास व्हिडिओ शेअर करत लॉन्च केली नवी जर्सी
विराटची दुखापत ठरणार फायद्याची! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारत जिंकणार अंतिम टी२० लढत?






