आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (18 ऑगस्ट) खेळला गेला. डब्लिन येथे झालेला हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ दोन धावांनी पुढे असल्याने विजयी ठरला. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला युवा फलंदाज रिंकू सिंग यांच्याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग याने आयपीएल 2023 हंगाम गाजवला होता. रिंकूने गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघातील एका सामन्यादरम्यान अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारून संघाला विजयी केले होते. त्यानंतरही केकेआरसाठी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात फलंदाजी करू शकला नसला तरी किरण मोरे यांनी त्याची स्तुती केली. ते म्हणाले,
“भारतीय संघात रिंकूच्या पदार्पणाची मी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होतो. रिंकू सिंग पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करेल आणि तो संघासाठी उत्तम फिनिशर बनू शकेल. युवराज सिंग आणि एमएस धोनीला आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यानंतर या दोघांसारखा फिनिशर आपल्याला मिळाला नाही. तो एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. मी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही पाहिले आहे. त्याच्या खेळात मोठा सुधार झालेला दिसतो.”
रिंकू सिंग आयर्लंडविरुद्धच्या मालिके नंतर चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करेल. पुढील वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने त्याची टी20 संघातील जागेची चाचपणी केली जात आहे.
(Former Indian Cricketer Kiran More Said Rinku Singh Will Play Finisher Role For Us)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव