भारत तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी 7 जुलै ही तारीख खूपच खास आहे. यामागील एकमेव कारण म्हणजे महेंद्र सिंग धोनी होय. 7 जुलै हा एमएस धोनी याचा जन्मदिवस होय. 7 जुलै, 1981 रोजी रांचीमध्ये धोनीचा जन्म झाला आहे. तो शुक्रवारी (दि. 7 जुलै) 42वा वाढदिवस साजरा करतोय. आज धोनी या दिग्गजाला कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. फक्त भारतातच नाही, तर जगभरात धोनीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. धोनीने हा सर्व चाहतावर्ग आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वगुणाच्या जोरावर कमावला आहे. धोनीने कारकीर्दीत असे अनेक विक्रम रचले, जे आजही अबाधित आहेत. आज धोनीच्या याच अबाधित विक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
खरं तर, एमएस धोनी (MS Dhoni) याने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या या घोषणेमुळे असंख्य क्रिकेटप्रेमी तसेच क्रिकेट दिग्गजांना धक्का बसला होता. असे असले, तरीही धोनी आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसतोय. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही त्याने असे काही विक्रम रचले आहेत, जे कोणी मोडू शकले नाहीये. या अबाधित विक्रमांमध्ये आयपीएलमधील कारनाम्यांचाही समावेश आहे.
धोनीचे अबाधित विक्रम
1. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी कामगिरी करून दाखवली आहे. ही कामगिरी इतर कोणतीही नसून आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याची आहे. धोनीने कर्णधार म्हणून सर्वप्रथम 2007 सालचा टी20 विश्वचषक भारतीय संघाला जिंकून दिला होता. त्यानंतर 2011 साली खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफीही भारताच्या नावावर करून दिली होती. विशेष म्हणजे, भारताने तब्बल 28 वर्षांनंतर (1983 नंतर) दुसरा वनडे विश्वचषक जिंकला होता. टी20 आणि वनडे विश्वचषकानंतर धोनीने आयसीसीच्या 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा किताबही भारताला जिंकून दिला होता. अशाप्रकारे तो आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार बनला.
2. सर्वात वेगवान स्टंपिंग (यष्टीचीत)- 0.08 सेकंद
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान स्टंपिंग (यष्टीचीत) करण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. धोनीने 2018मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील वनडे मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताने 377 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या डावातील 28व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर धोनीने कीमो पॉल याला अवघ्या 0.08 सेकंदात यष्टीचीत बाद केले होते. यावेळी हे षटक रवींद्र जडेजा टाकत होता. जडेजाने चेंडू टाकताच धोनीने बेल्स उडवल्या होत्या. अशाप्रकारे धोनीने क्रिकेट इतिहासातील सर्वात स्टंपिंग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.
3. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग (195)
धोनीच्या अबाधित विक्रमांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टंपिंग (यष्टीचीत) करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेट प्रकारातील 538 सामन्यात सर्वाधिक एकूण 195 वेळा स्टंपिंग करून फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा असून त्याच्या नावावर 139 स्टंपिंगचा विक्रम आहे.
4. वनडे रँकिंगमध्ये सर्वात वेगवान नंबर 1 स्थान पटकावणारा खेळाडू (42 डाव)
धोनीच्या अबाधित विक्रमांच्या यादीत आणखी एका विक्रमाचा समावेश आहे. तो विक्रम म्हणजेच आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सर्वात वेगवान अव्वलस्थान पटकावण्याचा होय. धोनीने अवघ्या 42 डावांमध्ये वनडे रँकिंगमधील अव्वलस्थान पटकावण्याचा विक्रम रचला होता. तो अशी कामगिरी करणारा क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान खेळाडू ठरला होता.
5. कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (332)
‘माही’ (Mahi) या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीच्या नावावर कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विक्रमाचीही नोंद आहे. धोनीने आतापर्यंत कर्णधार म्हणून तिन्ही क्रिकेट प्रकारात 332 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 178 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे, तर 120 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, 6 सामने बरोबरीत सुटले होते, तर उर्वरित 15 सामने अनिर्णित राहिले होते.
6. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने (226)
कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचाच विक्रम नाही, तर धोनीने आयपीएलमध्येही कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम नावावर केला आहे. धोनीची गणना आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच, 5 हंगामात त्याने संघाला उपविजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व करताना आयपीएलमध्ये एकूण 226 सामने खेळले आहेत. धोनीनंतर दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने कर्णधार म्हणून 158 सामने खेळले आहेत. मात्र, हे अंतर खूपच मोठे आहे.
7. आयपीएल इतिहासात 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम (59 षटकार)
आयपीएल (IPL) इतिहासात 20व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमातही धोनीच अव्वलस्थानी आहे. धोनी हा सीएसके (CSK) संघाचा खूपच महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने अनेक सामने 20व्या षटकात वादळी फलंदाजी करून संघाला जिंकून दिले आहेत. धोनीने आयपीएल इतिहासात 20व्या षटकात 50हून अधिक षटकार मारले आहेत. त्याच्या नावावर एकूण 59 षटकारांचा समावेश आहे. यावेळी त्याने एकूण 297 चेंडूंचा सामना केला होता.
8. आयपीएलच्या 20व्या षटकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (715 धावा)
विशेष म्हणजे, फक्त षटकार मारण्याच्या बाबतीतच नाही, तर धोनी आयपीएलमध्ये 20व्या षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने 95 डावात 20व्या षटकात फलंदाजी करताना 59 षटकारांच्या मदतीने तब्बल 715 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट हा 240.74 इतका राहिला होता.
9. सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने खेळणारा खेळाडू (11)
आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात खेळला गेला. अशाप्रकारे चेन्नईने 10व्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम केला. याव्यतिरिक्त धोनीनेही वैयक्तिकरीत्या 11व्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. अशाप्रकारे सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने खेळण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या तीन खेळाडू आहेत. त्यात सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू असून त्यांनी 8वेळा आयपीएल अंतिम सामना खेळला आहे.
10. आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टंपिंग (42)
‘कॅप्टन कूल’ नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीने त्याच्या मोठ्या कारकीर्दीत आपण सर्वात भारी यष्टीरक्षक का आहोत हे सिद्ध केले आहे. धोनीच्या नावावर आयपीएल इतिहासात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. यामध्ये 138 झेल असून इतर 42 विकेट्स या फक्त स्टंपिंग करून घेतल्या आहेत. यादीत दुसऱ्या स्थानी दिनेश कार्तिक असून त्याने 36 वेळा स्टंपिंग करून फलंदाजाला बाद केले आहे. आयपीएलच्या उद्घाटनापासून म्हणजेच 2008 पासून धोनी तज्ज्ञ यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे. त्याने आयपीएल कारकीर्दीत तब्बल कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघाच्या यशामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
धोनीच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 250 आयपीएल सामने खेळताना 38.79च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत. त्याने या धावा करताना एकूण 24 अर्धशतकेही झळकावली आहेत. नाबाद 84 ही धोनीची आयपीएलमधील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. यादरम्यान त्याने एकूण 3739 चेंडूंचा सामना केला होता. तसेच, तो 87 वेळा नाबाद राहिला होता. (Former Indian Cricketer MS Dhonis records that are unbreakable)
महत्वाच्या बातम्या-
ASHES । मार्क वुडने जाळला स्पीडोमीटर! भेदक गोलंदाजीपुढे उस्मान ख्वाजा क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
तोच चेंडू, तीच चूक! उनाडकटने सराव सामन्यात काढला विराटचा काटा, व्हिडिओ तुफान व्हायरल