इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शन (मोठा लिलाव) करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये अनेक संघ आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करून इतर खेळाडूंना रिलीज करू शकतात. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्ज संघ रिटेन करेल यात काही शंका नाही. परंतु तो स्वतः या संघाबाहेर जाऊ शकतो. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने याबाबत मत मांडले आहे.
भारतीय संघासाठी १० कसोटी सामने खेळणाऱ्या आकाश चोप्राने म्हटले की, “चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावामध्ये एमएस धोनीला रिटेन करतील यात काही शंका नाही. परंतु तुम्ही जर धोनीला विचाराल तर तो असे बोलू शकतो की, तुम्ही मला का रिटेन करत आहात? कारण धोनी येणारे पुढील ३ वर्ष आयपीएल खेळत राहील की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर असा कुठला नियम आला की, तुम्ही कुठल्याही खेळाडूला रिटेन करू शकत नाही; तर मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघ या नियमाशी सहमत असेल. या संघात पुन्हा नवीन खेळाडू भरती होतील. त्यांना १५ ते १७ कोटी देऊन कुठल्याही खेळाडूला थांबवण्याची आवश्यकता भासणार नाही. चेन्नई संघ रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी यांना रिटेन करेल. यासोबतच जर त्यांना संधी मिळाली तर ते आरटीएम कार्डचा वापर करत दीपक चाहरला देखील संघात स्थान देऊ शकतात.”
एमएस धोनीने इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच एमएस धोनी आयपीएल इतिहासात रोहित शर्मानंतर सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला ३ वेळेस जेतेपद मिळवून दिले आहे. तर युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी वगळता चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रत्येक हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
धोनीने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २११ सामने खेळले आहेत. यात त्याला ४०.२ च्या सरासरीने ४६६९ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने २३ अर्धशतक झळकावले आहेत; तर नाबाद ८४ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मिताली राज आणि वडील बनले रिक्षाचालकांचे देवदूत, वर्षभरापासून ‘अशी’ करतायत भरघोस मदत
वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान
‘या’ ३ हसीन अभिनेत्रींच्या प्रेमात होते ‘रवी शास्त्री’, पण त्यांची प्रेमकहाणी मात्र…