काही महिन्यांपूर्वी यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. ही स्पर्धा माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. ही स्पर्धा झाल्यानंतर, ते आगामी आयपीएल स्पर्धेत अहमदाबाद संघाला प्रशिक्षण देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ते येणाऱ्या कालावधीत काय करणार आहेत? याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.(Ravi Shastri statement)
रवी शास्त्री यांनी २०१७ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. या कालावधीत त्यांनी भारतीय क्रिकेटला मोलाचे योगदान दिले. आता मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, ते आगामी आयपीएल स्पर्धेत अहमदाबाद संघाला प्रशिक्षण देतील. परंतु त्यांनी स्पष्ट केले आहे की, ते पुन्हा एकदा समालोचन क्षेत्राकडे वळणार आहेत.
रवी शास्त्री (Ravi Shastri) हे उत्तम समालोचक आहेत. मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी समालोचन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे आयपीएल २०२२ स्पर्धेत ते समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, ते नुकतेच बायो बबल मधून बाहेर आले आहेत, इतक्यात त्यांना पुन्हा बायो बबलमध्ये जायचे नाहीये.
याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “मी आता बायो बबल मधून बाहेर आलो आहे. मला आता मोकळी हवा हवी आहे. माझे कोणाशीही बोलणं झालं नाहीये. मी कोणालाच काही म्हटलं नाहीये. मी कुठल्याही संघासोबत चर्चा केली नाहीये. मला फक्त विश्रांती हवी आहे. टेलिव्हिजन आणि मीडियाकडे नक्कीच परत जाईन. हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते.”
रवी शास्त्रींनी या गोष्टींना पूर्णविराम दिल्यानंतर आता अहमदाबाद संघाचा पुढील प्रशिक्षक कोण असेल? या चर्चा सुरू झाल्या आहेत. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू गॅरी कर्स्टनला या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद दिले जाऊ शकते. कारण त्यांच्याकडे भारतीय संघासह, दिल्ली डेअरडेविल्स ( दिल्ली कॅपिटल्स), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. माध्यमातील वृत्तानुसार, गॅरी कर्स्टन अहमदाबाद संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनण्याच्या शर्यतीत आहे. या यादीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचेही नाव आहे.
महत्वाच्या बातम्या :
“आता बस…” म्हणत बांगलादेशच्या दिग्गजाने दिले निवृत्तीचे संकेत
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
हे नक्की पाहा: