नवी दिल्ली । भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी नुकतेच एका मुलाखतीत भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. गावसकरांच्या फलंदाजीबद्दल बोलताना त्यांनी खुलासा केला होता की जर कोणीही त्यांना सरावादरम्यान फलंदाजी करताना पाहिले, तर त्याला विश्वास नाही बसणार की हा खेळाडू फलंदाजी करू शकतो.
याव्यतिरिक्त मोरे (Kiran More) यांनी सांगितले, की गावसकर (Sunil Gavaskar) जितके चांगले फलंदाज होते, तितकेच ते जास्त रागीट खेळाडू होते.
मोरे यांच्या मते, संपूर्ण भारतीय संघ त्यांच्या रागाला घाबरत होता आणि प्रयत्न करत होता, की जेव्हा गावसकर रागात असतील, तेव्हा कोणीही त्यांचा सामना करू नये.
भारतीय संघाचे माजी निवडकर्ता मोरे यांनी एका पॉडकास्टमध्ये चर्चा करताना म्हटले, गावसकरांना मैदानात बाद होणे आवडत नव्हते. ते बाद झाल्यानंतर त्यांना नेहमी राग येत होता. त्यामुळे संपूर्ण संघ त्यांच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत असायचा.
त्यादरम्यानचा एक किस्सा सांगताना मोरे म्हणाले, “मी गावसकरांसोबत वेस्ट झोनसाठी अनेक देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले होते. मला आठवते वानखेडेच्या एका कसोटी सामन्यात गावसकर 30 किंवा 40 धावा करून बाद झाले होते. जेव्हा ते परत येत होते, तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये कोणीही नव्हते. प्रत्येकजण त्यांच्यापासून स्वत: चा बचाव करण्यासाठी मैदानाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात पळताना दिसत होते. ते खूप रागात होते. जर ते 10 किंवा 15 धावा करून बाद झाले होते, तेव्हा त्यांना खूप राग येत नसायचा. परंतु खेळपट्टीवर 1 तास घालवल्यानंतर ते जेव्हा बाद व्हायचे, तेव्हा ते नेहमी म्हणायचे, ‘मी कसा काय बाद होऊ शकतो.'”
आपल्या काळात मोरे गावसकरांबरोबर अनेक देशांतर्गत सामने खेळले आहेत. मोरे यांच्यानुसार गावसकरांची सर्वात मोठी ताकद त्यांची एकाग्रता होती. त्याच्या जोरावर ते कोणत्याही कठीण आव्हानाचा पाठलाग करू शकत होते.
गावसकरांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 125 कसोटी सामने आणि 108 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत 51.12 च्या सरासरीने 10122 धावा केल्या आहेत. वनडे त्यांनी 35.13 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. त्यांनी एकूण 35 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गंभीर गुन्ह्याखाली श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल मेंडिसला अटक
-अशी एक चूक, ‘जी’ बुमराहच्या करियरची लावू शकते वाट
-पाकिस्तानी हिंदू लोकांच्या मदतीसाठी शिखर धवन आला मदतीला धावून