भारतीय संघाचे (Team India) आतापर्यंत अनेक मोठे यष्टीरक्षक फलंदाज होऊन गेले आहेत. संघाने नेहमी अशाच यष्टीरक्षकाला संधी मिळते, जो यष्टीरक्षणासोबतच एक उत्तम फलंदाज असेल. एमएस धोनी (MS Dhoni) भारताचा एक असा यष्टीरक्षक आहे, ज्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला फिनिशरच्या रूपात विजय मिळवून दिला आहे.
परंतु, आपण आज अशा यष्टीरक्षक फलंदाजांची विचार करणार आहोत, ज्यांनी धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली आहे आणि चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ‘सामनावीर’ निवडले गेले आहे. विषेश म्हणजे धोनीने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात एकदाही सामनावीर पुरस्कार जिंकलेला नाही. चला तर मग नजर टाकूया अशा चार सामन्यांवर ज्यामध्ये भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ‘सामनावीर’ निवडले गेले
१. दिनेश कार्तिक विरुद्ध बांगलादेश (२०१८)
भारतीय दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला संघासोबत खेळण्याच्या अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत, पण ज्या मिळाल्या त्यामध्ये तो विश्वासात पात्र ठरला आहे. २०१८ मध्ये निदास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कार्तिकने असे अप्रतिम प्रदर्शन केले होते, ज्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. बांगलादेशने या सामन्यात विजयासाठी भारतासमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कार्तिकने शेवटच्या षटकांमध्ये अवघ्या ८ चेंडूत २९ धावा ठोकल्या होत्या.
बांगलादेशी गोलंदाज सौम्य सरकारीच्या शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती, तेव्हा कार्तिकने शेवटच्या चेंडूवर जबरदस्त षटकार मारला आणि संघाला ट्रॉफी जिंकवून दिली. या जबरदस्त खेळीसाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते.
२. रिषभ पंत विरुद्ध वेस्ट इंडीज (२०२२)
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काही दिवसांपूर्वी तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील सर्वच्या सर्व सामने भारतीय संघाने जिंकले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) २८ चेंडूत ५२ धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याच्या या आक्रामक फलंदाजीमळे सर्वजण प्रभावित झाले होते. सोबतच त्याने स्वतःची गुणवत्ताही सर्वांना दाखवून दिली, ज्याची सध्या त्याला गरज होती. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते.
३. ईशान किशन विरुद्ध श्रीलंका (२०२२)
भारत आणि श्रीलंका यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशन किशन (Ishan Kishan) याने ८९ धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या खराब प्रदर्शनानंतर ईशानने जबरदस्त पुनरागमन केले आणि श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना संघाला जिंकवून दिला. टी-२० आंतरराष्ट्रीयमधील ईशान किशनने केलेली ही सर्वात मोठी खेळी आहे आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
४. केएल राहुल विरुद्ध न्यूझीलंड (२०२०)
भारताचा वरच्या फळीतील फलंदाज केएल राहुल (Kl Rahul) याला अनेकदा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहिले गेले आहे. आयपीएलमध्ये तो जास्त वेळा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. भारतीय संघ २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचे प्रदर्शन अप्रतिम राहिले होते आणि संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता. भारताला विजयासाठी १३३ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
भारताने ह लक्ष्य सहज गाठले. यामध्ये श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी महत्वाची भूमिका होती. राहुलने सामन्यात महत्वाच्या ५७ धावा केल्या होत्या, तर श्रेयसने ४४ धावा केल्या होत्या. केएल राहुलच्या जबरदस्त फलंदाजीसाठी त्याल सामनावीर निवडले गेले होते. राहुलच्या या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.