भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर नेहमी दमदार फटकेबाजी करताना दिसतो. परंतु अनेकदा निष्काळजीपणे शॉट मारल्यामुळे तो आपली विकेट गमावून बसतो. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या पंतने आक्रमक खेळी केली होती. परंतु डॉम बेसच्या चेंडूवर त्याने जॅक लीचच्या हाती सोपा झेल दिला आणि अवघ्या ९ धावांनी त्याचे शतक हुकले. यामुळे पंतच्या फलंदाजी शैलीवर टिका केली जात आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर हा पंतच्या समर्थनार्थ उतरला आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला की, “मला कधीही असे वाटणार नाही की पंतने बदलावे. कारण तुम्ही जितकी त्याच्या फलंदाजी शैलीवर टीका कराल, तेवढा तो बचावात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. तो त्याचे निवडक शॉट खेळण्याचा विचार करेल.”
“खरे तर, क्रिकेटमध्ये चढ-उतार येत असतात. कधी तुम्ही शतकाच्या खूप जवळ असाल. अशात एका चुकीच्या शॉटमुळे शतक पुर्ण होण्याआधीच तुम्ही बाद झालात. तेव्हा तुम्हाला स्वतलाच पश्चाताप होतो की तो शॉट खेळण्याची कसलीही गरज नव्हती. याउलट परिस्थितीचाही तुम्हाला सामना करावा लागू शकतो. जसे की, संघ पराभूत होण्याच्या मार्गावर असेल आणि तुम्ही फलंदाजी करत असाल. अशावेळी तुमच्यावर खूप दबाव निर्माण होतो, पण हीच ती वेळ असते, जेव्हा फलंदाज अविश्वसनीय खेळी करत संघाची कठीण परिस्थितीतून सुटका करतो,” असे पुढे बोलताना गंभीरने सांगितले.
“याचमुळे मी पंतला सांगू इच्छितो की, त्याने आपल्या फलंदाजी शैलीत बदल करू नये. त्याने त्याची नैसर्गिक खेळी करावी. फक्त पंतने कोणत्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमक शॉट खेळायचे आणि कुणाविरुद्ध बचावात्मक फलंदाजी करायची, यावर काम करावे,” असा सल्ला शेवटी गंभीरने दिला.
पहिल्या डावात उत्तम कामगिरी
चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पंतने १०३.४१ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत ९१ धावा चोपल्या होत्या. या खेळीसाठी त्याने ८८ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ९ चौकार मारले. अखेर ५६.४ षटकात इंग्लंडचा गोलंदाज डोम बेसने जॅक लीचच्या हातून त्याला झेलबाद केले होते. आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या डावात भारतापुढे ३८१ धावांचे लक्ष्य आहे. अशात पंतकडून संघाला मोठ्या आकडी धावसंख्येची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंतमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असती, तर भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकलीच नसती”
आव्हान मोठे असले तरी भारताला विजय शक्य; १२ वर्षांपूर्वीही केला होता असाच कारनामा
हिटमॅन आऊट ‘हा’ सलामीवीर इन! रोहित शर्माच्या फ्लॉप शोमुळे क्रिकेट रसिकांनी केली मागणी






