भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. शिखर धवन याच्या नेतृत्वातील संघाने या दौऱ्यावर वनडे मालिकेत विजय संपादन केला. मात्र, टी२० मालिकेमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला. या दौऱ्यावर भारताकडून तब्बल १२ खेळाडूंनी पदार्पण केले. यामध्ये वेगवान गोलंदाज चेतन सकारिया व संदीप वॉरियर यांचादेखील समावेश होता. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने या दोघांचे अभिनंदन केले आहे. दोघांनाही एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये मॅकग्राचे मार्गदर्शन लाभले होते.
मॅकग्राने केले भारतीय गोलंदाजांचे कौतुक
श्रीलंका दौऱ्यावर डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने वनडे व टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एक वनडे सामना खेळताना दोन तर, दोन टी२० सामने खेळताना एक बळी आपल्या नावे केला. टी२० मालिकेच्या अखेरच्या सामन्यात दुखापतग्रस्त नवदीप सैनी याच्या जागी संदीप वॉरियरला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली.
या दोन्ही युवा गोलंदाजांचे अभिनंदन करताना ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान व एमआरएफ पेस फाउंडेशनचा संचालक ग्लेन मॅकग्राने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करताना म्हटले, ‘चेतन व संदीप तुमचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला तुमच्या दोघांचा अभिमान वाटतो.’
A huge congratulations to both @sakariya.chetan & Sandeep Warrier for making their debut for India @_official_bcci_ So proud of you both. #mrfpacefoundation #fastbowlers #indvsl https://t.co/OUeMsnlFEz
— Glenn McGrath (@glennmcgrath11) July 31, 2021
मॅकग्रा २०१२ पासून चेन्नईस्थित एमआरएफ पेस फाउंडेशनचा संचालक आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचेच महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली हे या अकादमीचे काम पाहत असत.
दोघांनीही मानले मॅकग्राचे आभार
चेतन सकारियाने मॅकग्राचे आभार मानताना म्हटले, “मॅकग्रा मला म्हणाले होते तू तुझ्या तंदुरुस्तीवर मेहनत घेतली तर आणखी वेग वाढवू शकतोस. असे झाल्यास तू कमीत कमी रणजी ट्रॉफी तरी खेळशील.”
कूचबिहार ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर चेतनला सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले होते.
याचबरोबर संदीप वॉरियर यानेदेखील मॅकग्राचे आभार मानताना म्हटले, “सरांच्या टिप्स नेहमी मौल्यवान असतात. त्यांनी मलख सातत्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या सूचनांचे पालन केल्यानंतर माझ्यामध्ये बदल झाला.”
संदीप वॉरियरने आतापर्यंत ५७ तर, चेतन सकारियाने १५ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! पंड्या बंधूंनी मुंबईत घेतला ३० कोटींचा अलिशान फ्लॅट, ‘या’ बॉलीवुड ताऱ्यांचे होणार शेजारी
इंग्लिश क्रिकेटपटू टाकणार ऍशेसवर बहिष्कार? ‘हे’ आहे कारण
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा जायचे असल्यास भारतीय संघाला करावे लागेल ‘हे’ काम