इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेआधी अनेक दिग्गजांनी विविध मते तसेच अंदाज मांडले आहेत. यात आता गुगलचे भारतीय-अमेरिकन सीईओ सुंदर पिचाई यांचाही समावेश झाला आहे.
त्यांनी या विश्वचषकात भारत आणि इंग्लंड संघात अंतिम सामना व्हावा आणि भारतीय संघ जिंकावा असे म्हटले आहे. त्यांनी ते स्वत: क्रिकेट चाहता असल्याचेही सांगितले. तसेच ते जेव्हा अमेरिकेला आले तेव्हा त्यांनी बेसबॉल खेळण्याचा अनुभव सांगताना हा खेळ थो़डा आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया समिटमध्ये अमेरिकेचे सचिव माईक पोम्पेओ आणि भारत व अमेरिकेतील सर्वोच्च कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह वॉशिंग्टन प्रेक्षकांच्या उपस्थितीत यूएसआयबीसी अध्यक्ष निशा देसाई बिस्वाल यांनी पिचाई यांना ‘तूम्हाला काय वाटते कोणामध्ये अंतिम सामना होईल?’, असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाला उत्तर देताना पिचाई म्हणाले, ‘अंतिम सामना(आयसीसी 2019 विश्वचषकाचा अंतिम सामना) इंग्लंड आणि भारत संघात व्हायला पाहिजे. पण तूम्हाला माहित आहे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघही खूप चांगले आहेत.’
तसेच पिचाई त्यांचे अमेरिकेतील क्रिकेट आणि बेसबॉलचे अनुभव सांगताना म्हणाले, ‘मी जेव्हा इथे पहिल्यांदा आलो होतो. तेव्हा मी बेसबॉल शिकण्याचा प्रयत्न केला. पण हे थोडे आव्हानात्मक होते.’
‘माझ्या पहिल्या सामन्यात मला माझ्या एका शॉटचा अभिमान वाटला होता. कारण मी बॉल मागे मारला होता आणि क्रिकेटमध्ये हा चांगला शॉट असतो. पण लोकांनी त्याचे कौतुक केले नाही.’
‘क्रिकेटमध्ये तूम्ही जेव्हा धाव घेता तेव्हा तूम्ही बॅटही बरोबर घेता. त्यामुळे मी बेसबॉल खेळतानाही माझी बॅट घेऊन धावलो. अखेर मला कळाले की हे थोडे अवघड आहे. मी अनेक गोष्टी समायोजित (अडजेस्ट) करु शकतो पण तरी क्रिकेटबद्दल माझ्या भावना कायम राहतील.’
त्याचबरोबर क्रिकेट विश्वचषकाबद्दल पिचाई म्हणाले, ‘सध्या क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. ही खूप शानदार स्पर्धा आहे. यामध्ये भारताने चांगली कामगिरी करावी.’
पिचाई यांना या यूएसआयबीसीच्या इंडिया आयडिया समिटमध्ये ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल विश्वचषकानंतर होणारा टीम इंडियाचा विंडीज दौरा
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड विरुद्ध अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया
–डेव्हिड वॉर्नरने चक्क सामनावीर पुरस्कार दिला या लहान चाहत्याला, पहा व्हिडिओ