गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२चे विजेतेपद जिंकले आहे. संपूर्ण हंगामादरम्यान धडाकेबाज प्रदर्शन करत गुजरातने सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १३० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग गुजरातने १८.१ षटकातच केला आणि ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या या विजयामागची कारणे काय होती, याबद्दल या बातमीतून जाणून घेऊ…
गुजरातच्या अंतिम सामना विजयामागची ५ कारणे (Gujrat Titans 5 Reasons Of Win)-
१. गुजरातचा राजस्थानच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग
गुजरात संघाने चालू हंगामात आव्हानाचा पाठलाग करताना दमदार प्रदर्शन केले आहे. त्यांनी ९ पैकी ८ सामने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत. हीच बाब त्यांना अंतिम सामन्यासाठी फायदेशीर ठरली. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि त्यांना साध्या १३० धावा करण्यासाठीही संघर्ष करावा लागला. त्यामुळे गुजरातसाठी हा सामना जिंकणे आणखीनच सोपे झाले. सुरुवातीला २३ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी बचावात्मक खेळी केली आणि संघाला १९ षटकांमध्येच सामना जिंकून दिला.
२. राजस्थानला उभारता आली नाही सन्मानजनक धावसंख्या
राजस्थान संघाला या महत्त्वपूर्ण सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी ६० धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर पुढील ३८ धावांमध्ये राजस्थानने ५ विकेट्स गमावल्या. हार्दिक पंड्याने ३ तर राशिद खानने १ विकेट घेतली. याच कारणामुळे राजस्थानचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि गुजरातसाठी छोटे लक्ष्य पार करणे सोपे बनले.
३. प्रमुख फलंदाज ठरले फ्लॉप
राजस्थानचा जबरदस्त फॉर्मात असलेला सलामीवीर जोस बटलर अंतिम सामन्यात फ्लॉप ठरला. त्याने ३५ चेंडूत ३९ धावा करून विकेट गमावली. यामुळे राजस्थानचा संघ कमकुवत पडला. बटलरबरोबरच यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनही गुजरातच्या माऱ्यापुढे फेल ठरले. याचमुळे राजस्थान गुजरातला कठोर आव्हान देऊ शकेल अशी धावसंख्या करू शकला नाही.
४. गुजरातच्या गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन
गुजरातने अंतिम सामन्यात ६ वेगवेगळ्या गोलंदाजांना आजमावले. त्यापैकी ५ गोलंदाजांनी कमीत कमी १ विकेट घेतली. मोहम्मद शमी, यश दयाल, राशिद खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर साई किशोर आणि हार्दिक पंड्याने अनुक्रमे २ व ३ फलंदाजांना तंबूत धाडले. फक्त एकटा लॉकी फर्ग्युसन या सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरला. परंतु त्याने जास्त महागडी गोलंदाजी न करता कमीत कमी धावा देण्यासाठी प्रयत्न केला.
५. गिल आणि हार्दिकची मॅच विनिंग भागीदारी
गुजरात संघाला राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात मिळाली नव्हती. त्यांनी २३ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर हार्दिक आणि सलामीवीर शुबमन गिल यांनी बचावात्मक खेळी करत चांगली भागीदारी साकारली. त्या दोघांमध्ये ६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. त्यानंतर मॅथ्यू वेडने शेवटी फलंदाजीला येत १९ चेंडूत नाबाद ३२ धावांची विस्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश
IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video
कहर योगायोग! नऊ वर्षांपूर्वी चेन्नईबरोबर आणि आता राजस्थानबरोबर घडली सारखीच गोष्ट