भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तसेच गेल्या काही दिवसात इंग्लंड क्रिकेट वर्तुळात कोरोना व्हायरसचा शिरकाव झालेला पाहायला मिळाला आहे. त्यातच आता असे समोर येत आहे की भारतीय संघातील २ खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील एक खेळाडू रिषभ पंत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा सुरु असतानाच रैना आणि हरभजन यांनी त्याला लवकर बरा हो अशा शुभेच्छा देणारे ट्विट केले आहेत. रैनाने ट्विट केले की ‘लवकर बरा हो, भावा. यातून लवकर बाहेर येण्यासाठी शुभेच्छा.
Get well soon brother @RishabhPant17. Wish you a speedy recovery.
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) July 15, 2021
तसेच हरभजनने ट्विट केले की ‘चॅम्पियन, लवकर बरा हो’
Get well soon champion @RishabhPant17
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 15, 2021
भारतीय खेळाडूंना सुटी महागात
भारतीय संघाने इंग्लंड आल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना ताजातवाना होण्यासाठी साधारण ३ आठवड्यांची सुटी दिली होती. ही सुटी भारतीय संघासाठी महागात पडत असल्याचे दिसत आहे.
रिषभ पंत आयसोलेशनमध्ये
या सुटीनंतर भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी डरहॅम येथे आले आहेत. मात्र, माध्यमांतील वृत्तानुसार त्यांच्यासह रिषभ डरहॅमला आलेला नाही. तो सध्या ८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये आहे. तसेच तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला असला तरी त्याला कोणतीही लक्षणे नाही. पण आता तो भारतीय संघाशी कधी जोडला जाणार हे पाहावे लागणार आहे.
तसेच जरी सध्या रिषभ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची चर्चा होत असली तरी अजून त्याच्या नावाची पुष्टी बीसीसीआयकडून करण्यात आलेली नाही. मात्र, यापूर्वी बीसीसीआयने उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले होते की इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या खेळाडूंपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण तो भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात नसल्याने बाकी कोणाला धोका नाही. पण त्यांनी खेळाडूचे नाव उघड करण्यास नकार दिला.
भारतीय खेळाडू डरहॅम येथे सराव शिबिर पूर्ण करुन आणि सराव सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी नॉटिंगघमला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
होय आमचं आहे! राहुल-अथियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम, खुद्द क्रिकेटरने दिली कबुली
‘क्रिकेटचा देव’ आता विराजमान होणार खऱ्याखुऱ्या मंदिरात, सर्वात मोठ्या चाहत्याने सुरू केली तयारी
ख्रिस गेलनंतर ‘हा’ भारतीय असेल पुढील १४ हजारी मनसबदार, माजी क्रिकेटरचा दावा