भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना ‘कॉफी विथ करन’ या टिव्ही शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे मागील कांही दिवसांपासून टिकांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रकरणामुळे या दोघांवर बीसीसीआयने तात्पुरती निलंबनाचीही कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौराही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले आहे. तसेच त्यांना 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यालाही मुकावे लागणार आहे.
यामुळे हार्दिक घरातून बाहेरही पडत नसून कोणाचेही फोनही घेत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडिल हिमांशू पंड्या यांनी दिली आहे.
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार त्याचे वडिल म्हणाले, ‘त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील दुसरा वनडे सामना पाहिला. तो ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून घराच्या बाहेर पडलेला नाही. तो कोणाचेही फोनही घेत नाही. तो फक्त विश्रांती घेत आहे.’
हार्दिकने या प्रकरणामुळे नाराज असल्याने संक्रातीचा सणही साजरा न केल्याचे सांगताना हिमांशू म्हणाले, ‘संक्रातीला गुजरातमध्ये हा सुट्टीचा दिवस असतो. पण तरीही हार्दिकने पतंगही उडवले नाही. त्याला पतंग उडवायला आवडतात. पण तो नेहमी त्याच्या क्रिकेटच्या वेळापत्रकामुळे या सणाच्या दिवशी मागील काही वर्षापासून घरी नव्हता. पण आत्ताची परिस्थिती पाहता त्याची हा सण साजरा करण्याची इच्छा नाही.’
राहुल आणि पंड्या यांनी त्याच्या विधानांबद्दल माफी मागितली आहे. पण या दोघांवर सोशल मीडियातून बरीच टिका होत आहे. तसेच त्यांना बीसीसीआयच्या सदस्यांकडून टिकेला सामोरे जावे लागले आहे. या दोघांबाबत अजून बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण हा निर्णय होईपर्यंत या दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.
या बद्दल बोलताना हिमांशू यांनी सांगितले की, ‘हार्दिक निलंबन झाल्याने खूप नाराज आहे. त्यानी टिव्ही शोवर जी विधाने केली आहेत त्याचा त्याला पश्चाताप झाला आहे. त्याने सांगितले आहे की परत अशी चूक करणार नाही.’
‘आम्ही ठरवले आहे की त्याच्याशी या विषयावर काहीही बोलायचे नाही. त्याचा मोठा भाऊ कृणालनेही त्या शोच्या एपिसोडबद्दल हार्दिकशी काहीही चर्चा केलेली नाही. आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
–डाव्या हाताने ४७ आणि उजव्या हाताने १४ धावा करणाऱ्या डेविड वॉर्नरच्या खेळीबद्दल…
–दुसऱ्या वनडेत धोनीने केलेली ती मोठी चुक अंपायरसह कुणाच्याच लक्षात आली नाही…
–ऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली






