जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी सर्व संघांनी आपापले खेळाडू रिटेन केले आहेत. तसेच, पूर्वाश्रमीच्या आठ संघांव्यतिरिक्त या हंगामात अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या फ्रॅंचाईजी सामील झालेल्या आहेत. या दोन्ही फ्रॅंचाईजींना प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंची घोषणा लवकरच करण्यात येईल. तत्पूर्वी, अहमदाबाद फ्रॅंचाईजीबाबत (Ahmedabad Franchise) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
हा खेळाडू बनू शकतो कर्णधार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन नव्या संघांची निविदा काढल्यानंतर अहमदाबाद व लखनऊ हे संघ पुढील आयपीएलसाठी सामील करण्याचे निश्चित झाले. अहमदाबाद फ्रॅंचाईजीची मालकी सीव्हीसी कॅपिटल्सकडे गेली. तर, लखनऊ संघाचे मालकीहक्क संजीव गोयंका यांच्याकडे गेले. माध्यमांतील वृत्तानुसार, अहमदाबाद फ्रॅंचाईजी आपल्या संघाचा कर्णधार म्हणून भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांना नियुक्त करू शकते. तसेच, अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) हा देखील संघाचा भाग बनणे निश्चित झाले आहे.
हार्दिक पंड्या याने २०१५ पासून २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९२ सामने खेळताना १४०० पेक्षा जास्त धावा व ४२ बळी मिळवले आहेत. मुंबईने मिळवलेल्या चार विजेतेपदाचा वेळी तो संघाचा भाग होता. दुसरीकडे राशिद खान याला सध्याचा जगातील सर्वात्तम फिरकीपटू मानले जाते. तो २०१६ पासून सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. त्याच्या नावे आयपीएलमध्ये ७६ सामन्यात ९३ बळी जमा आहेत.
हा असू शकतो तिसरा खेळाडू
माध्यमातील वृत्तानुसार, हार्दिक व राशिद यांच्यासह भारताचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हा देखील अहमदाबाद संघाचा भाग होऊ शकतो. ईशान याने मागील तीन हंगामांत मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. तसेच काही मागील वर्षी भारतासाठी वनडे व टी२० पदार्पण केले आहे. त्याला टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) याचे नाव चर्चेत आहे. तर, मेंटर म्हणून भारताला २०११ वनडे विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांचे नाव समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर पंतच्या बेजबाबदार खेळण्यावर कर्णधार कोहली बोललाच! वाचा काय म्हटलंय त्याने (mahasports.in)